

पारगाव, ता. ३१ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील संदीप बबन धुमाळ या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याच्या बराकीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने सुमारे १०० पिशवी कांदा जळून गेल्याने सुमारे ८० हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने आग आटोक्यात आणल्याने सुमारे ५०० पिशवी कांदा आगीपासून वाचवण्यात यश आले.
खडकवाडी येथील धुमाळस्थळ येथे शुक्रवारी (ता. ३०) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास येथील संदीप धुमाळ यांच्या शेतात असलेल्या कांद्याच्या बराकीतून धूर येत असल्याचे व आग लागल्याचे दिसले. त्यावेळी जवळच्या शेतात असलेले मच्छिंद्र कानिफनाथ धुमाळ, अतुल दगडू धुमाळ, अजय बाळासाहेब धुमाळ यांनी तातडीने आरडाओरडा करत बराकीकडे धाव घेतली. वस्तीमधील इतरही शेतकरी बराकीकडे आले. त्यांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली. बराकीत एकूण ६०० पिशवी कांदा होता. ५०० पिशवी कांदा आगीतून वाचवण्यात यश आले, परंतु १०० पिशवी कांदा आगीत जळाल्याने सुमारे ८० हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
बराकीशेजारी पेट्रोल ची रिकामी बाटली सापडल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात संदीप धुमाळ यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, वाळुंजनगरचे माजी सरपंच महेंद्र वाळुंज, गुरुदेव पोखरकर, नितीन नरवडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.