बुद्धीबळ स्पर्धेत अन्वीचा डंका

बुद्धीबळ स्पर्धेत अन्वीचा डंका

Published on

पारगाव, ता. ८ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सातवर्षीय अन्वी हिंगेने ताजिकिस्तानच्या दुशांबे शहरात पार पडलेल्या वेस्टर्न एशिया युथ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सहा पदकांची कमाई केली आहे. स्पर्धा २० ते २९ एप्रिल २०२५ कालावधीत पार पडली. अन्वीने वैयक्तिक गटात तीन रौप्यपदके (स्टॅंडर्ड, रॅपिड आणि ब्लिट्झ) आणि यू ८ गर्ल्स इंडिया टीमसाठी खेळताना दोन सुवर्ण (स्टॅंडर्ड, रॅपिड) व एक रौप्यपदक (ब्लिट्झ) मिळवले.
गर्ल्स इंडिया टीममध्ये एकूण तीन मुलींचा समावेश होता. एशियन चेस फेडरेशन आणि ताजिकिस्तान चेस फेडरेशन यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये कझाकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, यूएई, जॉर्डन, मंगोलिया, किर्गिस्तान, इराक, ओमान, सौदी अरेबिया देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अन्वीने स्पर्धेत ताजिकिस्तान, इराण, कझाकिस्तान आणि मंगोलियाच्या खेळाडूंवर विजय मिळवला. फिडे वर्ल्ड कॅडेट अँड यूथ रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२५ (ग्रीस) स्पर्धेनंतर अन्वीने ग्रीसहून थेट ताजिकिस्तान गाठले आणि सलग दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.
अन्वी ही मूळची अवसरी बुद्रुक गावची रहिवासी असून सध्या इंदोरी (ता. मावळ) येथे वास्तव्यास आहे. अन्वी चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरीत शिकत आहे. तिच्या यशामुळे शाळा, प्रशिक्षक आणि सर्व महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशिक्षक प्रतीक मुळे यांनी सांगितले, ‘‘अन्वीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ती मेहनती असून सातत्याने यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.’’ अन्वीने डिसेंबर २०२४ मध्ये थायलंड येथे झालेल्या एशियन स्कूल्स बुद्धिबळ स्पर्धेत २ रौप्यपदके आणि पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद, तसेच महाराष्ट्र राज्य अंडर-७ विजेती होण्याचा मान पटकावला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा युवकचे कार्याध्यक्ष आशुतोष हिंगे यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. अन्वी जून महिन्यात बातुमी, जॉर्जिया येथे होणाऱ्या प्रतिष्ठित वर्ल्ड कप बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सप्टेंबरमध्ये तिचं लक्ष अलमाटी, कझाकिस्तान येथे होणाऱ्या फाईड वर्ल्ड कॅडेट (यू ८) चॅम्पियनशिपकडे लागलेलं असेल. नोव्हेंबरमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या एशियन युथ चॅम्पियनशिप स्पर्धा तिच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा असेल.

वैमानिकांकडून अन्वीचे अभिनंदन
स्पर्धा संपल्यानंतर अन्वी विमान प्रवासाने भारतात परत येत होती. प्रवास करण्यापूर्वी तपासणी करताना तिला मिळालेली पदके व ट्रॉफी पाहिल्यामुळे इंडिगो विमानाच्या वैमानिक आणि प्रवाशांनी अन्वीचे अभिनंदन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com