आंबेगावात ‘ॲनिमल आउट’चा उतारा

आंबेगावात ‘ॲनिमल आउट’चा उतारा

Published on

पारगाव, ता. १३ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्याचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने बिबट्याला पळवून लावण्यासाठी वनविभागाच्या वतीने ‘ॲनिमल आउट’ हे औषध गावठाणाच्या सीमेवर फवारणी करत असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.
जुन्नर वनपरिक्षेत्रात असणाऱ्या आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याच्या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ऊस तोडणी हंगाम सुरू असल्यामुळे उसालाच आपला रहिवास मानलेले बिबट्या आता सैरभैर झाल्यामुळे ते नागरिकांना दिवसा रात्री दिसू लागले आहेत. त्यांचा रहिवास ऊस हे पीक नष्ट झाल्यामुळे ते आता परिसरातील गावठाण भागात येऊ लागले आहे. उसालाच आपला रहिवास मानून बिबटे एक ते दीड वर्ष आरामशीरपणे उसाच्या पिकात राहत असतात; मात्र आता ऊसतोडणी सुरू झाल्यामुळे ज्या उसाच्या शेतात ते राहतात ते तुटल्यामुळे ते आता सैरभैर झाले आहेत. अनेकवेळा शेती परिसर सोडून गावठाणात देखील येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांनी देखील बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केले आहेत. घराला तसेच गोठ्याला उंच तारेचे कंपाउंड बनवणे, परिसर प्रकाशमान करणे, सीसीटीव्ही बसविणे, घराला व गोठ्याला सौर कुंपण बसविणे अशा उपाययोजना करत आहेत; मात्र तरीदेखील बिबटे जनावरांवर हल्ले करत आहेत. आता वनविभागाने नागरी वस्तीच्या ठिकाणी वारंवार बिबट्याचे दर्शन होणे, हल्ले करणे या घटनेमुळे त्या परिसरात ‘ॲनिमल आउट’ हे औषध फवारणी सुरू केले आहे.

औषधाचा परिणाम ६० दिवस राहतो
‘ॲनिमल आउट’ या औषधाच्या उग्र वासामुळे कोणत्याही प्रकारचा प्राणी औषध फवारलेल्या ठिकाणी फिरकत नाही. या औषधाचा परिणाम सुमारे ६० दिवस राहत असतो. अवसरी बुद्रूक परिसरामध्ये वनविभागाने ॲनिमल आउट हे औषध फवारले आहे. यावेळी वनरक्षक सी.एस. शिवचरण, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, रमेश शिंदे यांनी हे औषध गावठाण हद्दीत फवारून घेतले आहे.


भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांनी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या ज्या परिसरात तोडणीसाठी जात आहेत त्यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याच्या वतीने औषध देऊन हे औषध एखाद्या कपड्याला लावून तोडणी दरम्यान कामगार जवळपास लावत आहेत तसेच ट्रॅक्टरवरही अशा प्रकारचे कापड औषध लावून ठेवले जात आहे. ज्या ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या आहेत त्या परिसरात देखील अशाच प्रकारचे कापड औषध लावून ठेवले आहे. जेणेकरून ऊस तोडणी कामगार देखील सुरक्षित राहतील.
- दिलीप कुरकुटे, मुख्य शेतकी अधिकारी, भीमाशंकर साखर कारखाना


06324

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com