धामणीकरांचे वीज जोडासाठी सामूहिक उपोषण

धामणीकरांचे वीज जोडासाठी सामूहिक उपोषण
Published on

पारगाव, ता. ५ : दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या धामणीत (ता. आंबेगाव) शेतीच्या उपसा सिंचन योजनेसाठी तातडीने नवीन वीज जोड द्यावा, या मागणीसाठी तब्बल ३०० ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.५) एकदिवसीय लक्षणिक उपोषण केले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागणीसाठी गावातून फेरी काढली. शासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.

उपोषण सुरू होण्याच्या अगोदर ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी येत्या मंगळवारी (ता. १०) डिंबा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरुवारी (ता. १२) मंचर येथील प्रांतकार्यालयावर, पाळीव जनावरांसह धडक मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय झाल्याचे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी सांगितले.

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, व देवदत्त निकम यांनी लिंबू पाणी दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. धामणी गावातील शेतकरी एकत्र येत लाखो रुपये खर्च करून सामूदायिक उपसा सिंचन योजना राबवण्यास सुरुवात केली परंतु राज्यात यापुढे शेतीपंपासाठी नवीन वीज जोड देणे बंद केले. त्यामुळे धामणी परिसरात एकूण सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून सुरू होत असलेल्या नऊ उपसा सिंचन योजना अडचणीत आल्या आहे. या सर्व उपसा सिंचन योजनांना शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने वीज जोड द्यावा या मागणीसाठी संपूर्ण गावानेच उपोषण केले.

दरम्यान, राज्यात शेतीपंपासाठी नवीन वीज जोड देणे बंद केले असून सोलरवर शेतीपंप चालवावा, असे शासकीय धोरण निच्छित करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका उपसा सिंचन योजनेसाठी सोलर प्रकल्प बसवण्यात आला परंतु त्यावर शेतीपंप फक्त २५ टक्के क्षमतेने चालत आहे. त्यामुळे सोलर प्रकल्प कुचकामी ठरला असल्याचे माजी सरपंच सागर जाधव, रेश्मा बोऱ्हाडे, मंगेश नवले, प्रतीक जाधव यांनी सांगितले.

काही महिन्यापूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी वीज जोडाबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमच्या निवेदनावर विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, असा शेरा देऊनही महावितरण वीज जोड देत नाही, असे सरपंच अक्षय विधाटे यांनी सांगितले. यासंदर्भात माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही शेतकऱ्यांनी अनेकदा भेट घेऊन निवेदन दिले आहे, असे अक्षय विधाटे यांनी सांगितले. एक वर्ष होऊनही त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सामूहिक उपोषण केले.


उपमुख्यमंत्री शिंदेसोबत शनिवार बैठक
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, देविदास दरेकर, अंकिता वाळुंज यांनी उपोषणस्थळी भेट दिली व उपोषकर्त्यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शनिवारी (ता. ७) वीज जोडाबाबत मुंबई येथे बैठक बोलावली आहे, असे सांगितले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील हेही या प्रश्नासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत.


छेड
06695

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com