जुन्नरच्या पश्चिम भागात मातीची लूट
जुन्नर, ता. ४ ः जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात माती माफियांनी धुडगूस घातला आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहनातून होत असलेल्या माती वाहतुकीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे, तर या वाहतुकीमुळे आदिवासी भागातील रस्त्यांचे अक्षरशः वाटोळे झाले असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. माती माफियांवर अंकुश ठेवण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत आदिवासी आजी-माजी सरपंच महासंघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष पोपट रावते यांनी सांगितले की, आदिवासी भागातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील घाटघर, जळवंडी, खडकुंबे, ऊसराण, शिरोली पूर, चावंड, निमगिरी, खांडेचीवाडी, बगाडवाडी, पारगाव, तळेरान, खुबी करंजाळे, कोपरे मांडवे या गावांमध्ये राजरोसपणे मशिनच्या मदतीने माती उत्खनन केले जात आहे. आदिवासी भागातील कुठल्याही ग्रामपंचायतीची ग्रामसभा झालेली नाही, असे असताना या गावांमध्ये रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने माती वाहतूक होत आहे. वारंवार महसूल विभागाला पत्रव्यवहार करूनदेखील आदिवासी भागातील माती वाहतूक बंद होत नसल्याने तत्काळ माती वाहतूक बंद न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा रावते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात राजरोसपणे अवजड वाहनातून सुरू असलेल्या माती वाहतुकीने आधीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे या माती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा वेगावर ताबा नसल्याने बेदरकारपणे अवजड वाहने रस्त्याने अक्षरशः पळवली जात आहेत. यातून गंभीर अपघाताच्या घटना घडत आहेत.
कारवाईची मागणी
अवैध पद्धतीने होणाऱ्या गौण खनिज उत्खननाबाबत गावपातळीपासून तालुका स्तरावरील महसूल प्रशासनातील अधिकारी कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याने माती माफिया व संबंधित अधिकारी यांच्यात काही अर्थपूर्ण घडामोडी घडत आहेत का? असा सवाल या भागातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. आदिवासी भागातील निसर्ग संपदेचे लचके तोडणाऱ्या या माती माफियांच्या प्रशासनाने तत्काळ मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

