ठिबक सिंचनाच्या बोगस प्रस्तावांचा पर्दाफाश

ठिबक सिंचनाच्या बोगस प्रस्तावांचा पर्दाफाश

Published on

जुन्नर, ता. ४ : ठिबक सिंचनाचे बोगस प्रस्ताव सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे मंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तर तीन दुकानदारांवर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती खेड उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली.
याप्रकरणी उपकृषी अधिकारी शिवकांत कोल्हे व प्रमिला वाळकू मडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शासनाची फसवणूक करत शासकीय रकमेचा अपहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कृषी विभागातील या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड उपविभागीय कृषी कार्यालयांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यांचा समावेश आहे. ठिबक सिंचनाच्या अनुदानाच्या प्रस्तावांची तपासणी करताना बोगस बिले, चुकीच्या पद्धतीने अपलोड केलेले फोटो याबाबत जुन्नर तालुक्यातील बेल्हे मंडळातील काही प्रस्तावाबाबत उपविभागीय कृषी अधिकारी शिरसाठ यांना शंका निर्माण झाली. त्यानुसार शिरसाठ यांनी या सर्वच प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली.
या पथकांद्वारे बेल्हे मंडळातील ठिबक सिंचनाच्या जवळपास ४६१ प्रस्तावांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल ३४८ प्रस्ताव हे बोगस असल्याचे आढळले. सदरचे बोगस प्रस्ताव मंजूर झाले असते तर शासनाची तब्बल दोन कोटी ८६ लक्ष रुपयांची फसवणूक झाली असती मात्र उपविभागीय कृषी अधिकारी शिरसाठ यांनी तत्काळ केलेल्या कार्यवाहीमुळे बोगस प्रस्तावांची पडताळणी होऊन शासनाच्या रकमेचा होणारा अपहार रोखण्यात कृषी विभागाला यश आले. दरम्यान, या प्रस्तावांपैकी पंधरा प्रस्तावांच्या अनुदानाची रक्कम रुपये पाच लाख आठ्याऐंशी हजार एवढी रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. मात्र कृषी विभागाने सदरची रक्कम वसूल करण्याचे आदेश या लाभार्थ्यांना दिले आहेत.
याप्रकरणी बोगस बिले अथवा अन्य कारणास्तव तुळजाई इरिगेशन बोरी बुद्रुक, ओम साई ॲग्रो एजन्सी बेल्हे, श्रीनाथ इरिगेशन बेल्हे या तीन दुकानदारावर वितरक नोंदणी करारातील अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे त्यांची जिल्हास्तरावरील ई ठिबक प्रणाली व महाडीबीटी पोर्टलवरुन नोंदणी कायमस्वरूपी रदद करण्यात आली आहे. या तसेच ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अनुदानासाठी शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचाची विक्री करू नये असा आदेश या तीन दुकानदारांना देण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी केली.
दरम्यान, कृषी विभागातील हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com