

जुन्नर, ता. २ : हनुमान जयंतीनिमित्त जुन्नरच्या पंचक्रोशीतील निरगुडे, मढ, उंडेखडक या गावांमध्ये सुरू असलेल्या यात्रा महोत्सवात पावसामुळे व्यत्यय आला. या गावांमधील आयोजित मनोरंजनाचे कार्यक्रम, बैलगाडा शर्यती आदींत पावसामुळे व्यत्यय आल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला.
मीना नदीच्या तसेच आदिवासी भागात खोऱ्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. एक तासाहून अधिक सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
काले, दातखिळेवाडी, येणेरे, वडज, पारुंडे, चिंचोली, काटेडे, कुसूर या ठिकाणी सध्या कांदा काढणी सुरू आहे. कांदा काढणी सुरू असतानाच काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबा, गहू या पिकालाही या पावसाचा फटका बसणार आहे.