चोरी पकडली, आता नोटीस पाठवणार

चोरी पकडली, आता नोटीस पाठवणार

Published on

बावडा, ता. १७ : ‘‘येथील बाजार तळावर लावलेला विरोधी पक्षाचा (राष्ट्रवादी कॉंग्रेस) बॅनर मी पाहिला. आयुष्यातली पहिली लढाई या बॅनरवरील पक्षाचे नाव व चिन्हासंदर्भात आहे. आयुष्यात मी कोर्टाची पायरी चढली नव्हती, पण यांच्यामुळे मी कोर्टाची पायरी चढले. पण मला आनंद आहे की त्याच्यामुळे मी भांडायला शिकले. या बॅनरवर चिन्हाखाली लिहिलेलं पाहिजे की, ‘हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे’, पण या बॅनरवर मला ते कुठेही लिहिलेलं दिसलं नाही. म्हणून हा कोर्टाचा अपमान आहे. या बॅनरचे फोटो काढून मी उद्या कोर्टात दाखवणार आहे. संविधानाने हा देश चालतो कोणाच्या बापाने नाही. चोरी आज तो पकडी गयी, आता कोर्टातच गाठ आहे. तालुक्यात जिथे जिथे असे प्रचाराचे त्यांचे बॅनर आहेत, त्यांना मी नोटीसच पाठवणार आहे,’’ अशा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
बावडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. १६) रात्री आयोजित सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ॲड. तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, अंकिता पाटील- ठाकरे, उदयसिंह पाटील, सागर मिसाळ, प्रफुल्ल चव्हाण, प्रभाकर खाडे, नाना गवळी आदी उपस्थित होते. राजवर्धन पाटील यांनी स्वागत केले. यावेळी वकीलवस्तीसह अनेक गावातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. रामोशी समाज संघटनेसह अनेक संघटनांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले.
‘‘हर्षवर्धनभाऊ सांगत होते, ‘मी एकटा पडलोय’, पण नाही, भाऊ तुमची ही बहीण आहे ना...तुम्ही माझ्याबरोबर थोरले भाऊ म्हणून उभे राहिलात, तुमची लहान बहीण तुमच्या पाठीशी आहे. निवडणुकीमध्ये जे मला सोडून गेले, त्यामुळे माझी मतं वाढली. त्यामुळे हर्षवर्धनभाऊंसाठी हा शुभ संकेत आहे. तसेच, पवारसाहेबांचे आशीर्वाद आपले पाठीशी आहेत. त्यामुळे तुमच्यासह पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘जशी ताई तुमच्यावर वेळ आली, शरद पवार आणि तुम्हाला सोडून सगळे गेले, तशी आज माझ्याकडे वेळ आली आहे. काही लोकं आम्ही मोठी केली, त्यांना समाजात ओळख दिली, त्यांना पद दिली, गाड्या- बंगले झाले, कोणाच्या जिवावर झाले? आज समाजात मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहेत. पुढारी जरी सोडून गेले तरी सर्व जनता माझ्याबरोबर आहे. २० तारखेच्या मतदानातून आणि २३ तारखेच्या निकालातून राज्याला दाखवून द्या की इंदापूर तालुका हा हर्षवर्धन पाटील यांचे कुटुंब आहे.’’

हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर तालुक्यात एमआयडीसी आणली १० हजार लोकांना प्रत्यक्षात प्रत्यक्ष रोजगार मिळाला. शरद पवारांनी सिनारमास आणली, तिथेही कामगार काम करतात. इंदापूर तालुक्यात सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. ज्यांनी गेली दहा वर्षे इंदापूर तालुक्याचे नेतृत्व केलं, किती लोकांना रोजगार दिला? किती संस्था आणल्या? सर्वसामान्यांची पोरं कामाला लावली? कोणती एखादी शिक्षण संस्था काढली? माळशिरस तालुक्यातील बरेच कॉन्ट्रॅक्टर इंदापूर तालुक्यात काम करतात.
- धैर्यशील मोहिते पाटील, खासदार

गद्दारी करणाऱ्यांना जनतेने
घरी बसवावे : जयंत पाटील
वडापुरी : ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे पवारसाहेबांना फसविणाऱ्या व गद्दारी करणाऱ्यांना इंदापूर तालुक्यातील जनतेने घरी बसवावे. पवारसाहेबांना चॅलेंज करणे हे जनता कधी माफ करणार नाही. पवारसाहेबांनी दत्तात्रेय भरणे (मामा) यांना आमदार केले, मंत्री पद दिले, मात्र ते पवारसाहेबांना सोडून गेले. अशांना किती हजारांनी पाडायचे, हे मतदारांनी ठरवावे,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काटी (ता. इंदापूर) येथे केले.
काटी येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सध्या हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यात चांगले काम करत आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याची इंदापूरला गरज आहे. ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष असून, येणाऱ्या काळात लोणी देवकर
एमआयडीसीमध्ये उद्योग व्यवसाय आणून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल व इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवला जाईल.’’ यावेळी हिंगणगाव येथील दीपक जगताप व त्यांच्या मित्र परिवारांनी पक्षप्रवेश केला.

SHS24B07626

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com