
‘उजनी धरण परिसर जैवविविधतेचा उत्तम नमुना’
भिगवण, ता. १३ ः ‘उजनी धरण परिसरामध्ये स्थानिक व स्थलांतरित असे सुमारे साडेतीनशे प्रकारचे पक्षी आढळून येतात. विविध वनस्पती व पक्षी हे अभ्यासक, पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. उजनी धरण परिसर हा जैवविविधतेचा एक उत्तम नमुना असून, स्थानिक विद्यार्थ्यांनी उजनी धरणावरील पक्ष्यांविषयी सखोल संशोधन केले पाहिजे,’ असे मत पक्षी अभ्यासक उमेश सल्ले यांनी व्यक्त केले.
येथील कला महाविद्यालयामध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ‘उजनी धरणावरील पक्षी’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते, तर डॉ. प्रशांत चवरे, प्रा. श्याम सातर्ले, डॉ. सुरेंद्र शिरसट, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. किरण गुणवरे, प्रा. धनाजी मत्रे, प्रा. कविता देवकाते उपस्थित होते.
यावेळी सल्ले यांनी उजनी धरण परिसरातील स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांविषयी
सखोल माहिती सांगून फोटो व व्हिडिओ दाखविले.
प्राचार्य डॉ. वाळुंज म्हणाले की, उजनी धरणावरील पक्षी विषयावरील व्याख्यान, छायाचित्र व व्हिडिओ प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नवी दिशा मिळेल.
यावेळी प्रा. धनाजी मत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा. अविनाश सूर्यवंशी यांनी, सूत्रसंचालन प्रा. अमोल कुंभार यांनी, तर आभार प्रा. दशरथ कुदळे यांनी मानले.
-------------------------------