पर्यटकांना खुणावतोय उजनीचा काठ
- डॉ. प्रशांत चवरे, भिगवण
महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या उजनी धरणाची निर्मिती १९८० मध्ये झाली. भीमा नदीवर उभारलेले हे धरण पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषवर वसले आहे. दीर्घकाळ सिंचनाचा मुख्य आधार राहिलेले हे धरण आणि त्याचा परिसर आज केवळ जलसिंचनापुरता मर्यादित न राहता हिवाळी पर्यटनाचा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. हिवाळ्याच्या कालावधीत उजनी जलाशय परिसरात परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर आगमन होते. त्यामुळे उजनी काठाला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसरामध्ये असलेली प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणे या स्थानाचे महत्त्व अधोरेखित करतात.
निसर्गसौंदर्य व पक्षीवैभव यांचा सुरेख संगम
धरणाचा अथांग जलाशय हे येथील प्रमुख आकर्षण आहे. धरणाच्या पाण्यावर उमटणारे सूर्यकिरण, संथ लाटांवर पडणारे सोनेरी प्रतिबिंब आणि दूरवर पसरलेले निळेशार आकाश मन मोहून टाकते. हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे येथे सूर्योदय व सूर्यास्ताची दृश्ये अत्यंत रमणीय दिसतात. नोकानयन, छायाचित्रण आणि निसर्ग निरीक्षणासाठी हा परिसर पर्यटकांना विशेष भावतो.
पक्षीप्रेमींसाठी उजनी काठ म्हणजे एक पर्वणीच ठरते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून येथे येणारे परदेशी रोहित पक्षी, युरोपियन भोरड्यांचे थवे, चित्रबलाक, बदके, करकोचे, पाणकावळे, स्पूनबील अशा सुमारे २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात. भादलवाडी तलाव हा चित्रबलाक पक्ष्यांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. या पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे उजनी परिसराला स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.
प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वारसा
उजनी काठ केवळ निसर्गरम्यच नाही, तर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही समृद्ध आहे. पळसदेव, चिखलठाण, कोटलिंग आणि नीरा नरसिंहपूर आदी ठिकाणची प्राचीन मंदिरे धार्मिक पर्यटकांच्या मनामध्ये भक्तिभाव जागवतात तर नीरा नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र मानले जाते. इंदापूर येथे असलेली ऐतिहासिक मालोजीराजे भोसले गढी आणि इंद्रेश्वर मंदिर इतिहासाची साक्ष देतात. शांत वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात आध्यात्मिक समाधान देणारी ही धार्मिक व ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना भूतकाळाशी व अध्यात्माशी जोडून ठेवतात.
खाद्यसंस्कृती व ग्रामीण जीवनाचा अनुभव
उजनी काठाचा अनुभव घेताना येथील स्थानिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे ही पर्वणीच ठरते. कुंभारगाव, डिकसळ, तक्रारवाडी, डाळज परिसरात चुलीवरचे पारंपरिक जेवण, घरगुती मटनाहार तसेच उजनी जलाशयातील ताज्या मासळीचे पदार्थ खवय्यांना आकर्षित करतात. जलाशयातील गोड्या पाण्यातील मासळी ही भिगवणची मासळी म्हणून राज्यात ओळख मिळवत आहे.
केव्हा, कसे व काय पहाल?
डिसेंबर ते एप्रिल हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून उजनी काठावरील भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, कुंभारगाव, डाळज, पळसदेव आदी गावांना खासगी वाहनाने सहज पोहोचता येते. भिगवण आणि दौंड ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. पक्षी निरीक्षण, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक गढी आणि भव्य उजनी धरण ही येथे पाहण्यासारखी प्रमुख ठिकाणे आहेत.
प्रदूषण व असुविधांचा परिणाम
मागील ४० वर्षांहून अधिक काळ हिवाळी पर्यटनासाठी उत्तम पर्याय असलेल्या व देश विदेशातील पक्ष्यांची मांदियाळी असलेल्या उजनी काठच्या पर्यटनाला अलीकडे प्रदूषणाची नजर लागली आहे. दिवसेंदिवस जलाशयातील पाण्याचे वाढते प्रदूषण स्थलांतरित पक्ष्यांवर आणि जलसौंदर्यावर परिणाम करत आहेत. परिसराचे नैसर्गिक वैभव टिकवण्यासाठी शासकीय पातळीवरून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तसेच पर्यटकांना सुविधा दिल्यास
पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

