भोर-मांढरदेवी मार्गावर वाहनांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर-मांढरदेवी मार्गावर वाहनांची गर्दी
भोर-मांढरदेवी मार्गावर वाहनांची गर्दी

भोर-मांढरदेवी मार्गावर वाहनांची गर्दी

sakal_logo
By

भोर, ता. २ ः मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळूबाई देवीच्या (मांढरदेवीच्या) यात्रेच्या मुख्य दिवसांपूर्वीच भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जात असल्यामुळे भोर-मांढरदेवी मार्गावर वाहनांची गर्दी होत आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवार (ता. ५) ते शनिवार (ता. ७) प्रशासनाकडून बंदोबस्त असल्यामुळे त्यापूर्वीच भाविक दर्शनाला येत आहेत. गुरुवारपासून प्रशासनाकडून तपासणी पथक, वाहतूक व्यवस्था आणि सर्व प्रकारच्या सुरक्षिततेसाठीचे नियोजन केले आहे. त्यामुळे यात्रेच्या मुख्य दिवसांत मांसाहार, पशुहत्या, मद्यपान करता येणार नाही. शिवाय कोणत्याही प्रकारची वाद्ये वाजविता येणार नाहीत. म्हणून जादातर भाविक हे यात्रेच्या मुख्य दिवसांपूर्वी येतात किंवा त्यानंतर येतात. भोर-मांढरदेवी मार्गावरील अंबाडखिंड घाटापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडाखाली गाड्या थांबवून मांसाहारी नैवेद्य बनविला जात आहे. देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर मांसाहार करून भाविक परतीच्या प्रवासाला निघत आहेत. भाविकांच्या या कृत्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. कारण भाविकांनी टाकलेल्या खरकट्या पत्रावळ्या आणि मांसाहाराचे पदार्थ खाण्यासाठी मोकाट जनावरे येत आहेत. मद्यपान करणाऱ्या भाविकांना हटकल्यास वाद निर्माण होत आहेत.

भोर शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
शहरातील चौपाटी परिसरात मांढरदेवीला जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला रस्त्यावर भाजीवाले, पथारीवाले, चिकन विक्री करणारे थांबतात. शिवाय खासगी वाहनेही रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे त्याठिकाणी वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पोलिसांनी आणि नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास अपघाताचा धोका संभावण्याची शक्यता आहे.