भोर उपजिल्हा रुग्णालयाला ‘महावितरण’कडून झटका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर उपजिल्हा रुग्णालयाला
‘महावितरण’कडून झटका!
भोर उपजिल्हा रुग्णालयाला ‘महावितरण’कडून झटका!

भोर उपजिल्हा रुग्णालयाला ‘महावितरण’कडून झटका!

sakal_logo
By

भोर, ता. ३ : येथील राज्य सरकारच्या उपजिल्हा रुग्णालयाचे तीन वर्षांचे १० लाख ६२ हजार ७९० रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने शुक्रवारी (ता. ३) दुपारी रुग्णालयाची वीज तोडली. वारंवार मागणी करूनही आणि मुदतवाढ देऊनही उपजिल्हा रुग्णालयाचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. दरम्यान, अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर ‘महावितरण’कडून सायंकाळी रुग्णालयाचा वीज पुरवठा पुन्हा जोडण्यात आला.
रुग्णालयाची वीज तोडण्याबाबत २५ जानेवारीला ‘महावितरण’ने नोटीस दिलेले होते. मात्र, रुग्णालयास शासकीय निधी मिळाला नसल्यामुळे वीज बिल भरण्यात आले नाही, असे सांगत पुढील एका महिन्याच्या कालावधीत वीजबिल भरण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन आरोग्य विभागाकडून देण्यात आले होते. परंतु, अद्यापही वीज बिल न भरल्यामुळे महावितरण शुक्रवारी रुग्णालयाचा वीजपुरवठा बंद केला. महावितरणचे शाखाधिकारी सचिन राऊत यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन रुग्णालयाचा वीजपुरवठा बंद केला.
वीजपुरवठा बंद केल्यामुळे रुग्णालयातील मशिनद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा ठप्प झाल्या. याशिवाय रुग्णालयात अंधार आणि पंखेही बंद झाले. त्यामुळे भर उन्हाळ्यात रुग्णांचे हाल सुरु झाले. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांनी सांगितले. त्यामुळे ‘महावितरण’कडून सायंकाळी रुग्णालयाचा वीज पुरवठा पुन्हा जोडण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची मिळून सहा कोटी रुपयांची बिलाची थकबाकी देणे आहे.
शासनाकडे निधीची मागणी करूनही अद्याप निधी मिळालेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ येमपल्ले यांनी दिल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले.