
महिलांना मिळणार १० रुपयांत इकोफ्रेंडली पिशवी
भोर, ता. ८ : शहरातील महिलांना बाजारासाठी व इतर गोष्टींसाठी केवळ १० रुपयांमध्ये इकोफ्रेंडली कापडी पिशवी मिळणार आहे. नगरपालिकेने १० रुपयांचे नाणे टाकून एक कापडी पिशवी मिळणाऱ्या दोन अॅटोमॅटिक वेंडिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी (ता.८) नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या हस्ते या मशिन्सचे उद्घाटन करण्यात आले.
भोर नगरपालिकेच्या वतीने कापडी पिशव्यांच्या दोन वेंडिग मशिन्ससाठी २८ हजार रुपये खर्च केले आहेत. प्लॅस्टीक मुक्ती हा उपक्रम सुरु केला असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले. बाजारात येणाऱ्या महिलांनी आणि इतरांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्लॅस्टीक मुक्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले.
यावेळी किरुळकर, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अमित सागळे, पाणीपुरवठा विभागाच्या किशोरी फणसेकर, बचत गटांच्या समूह संघटक स्मिता जाधव, बांधकाम विभागाचे अभिजित सोनवले आणि आरोग्य विभागासाठी काम करणाऱ्या ''ग्रीनी द ग्रेट'' या संस्थेचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
भोर शहर प्लॅस्टीक मुक्त करण्यासाठी शहरातील महिलांना १० किलो धान्य बसेल, अशी कापडी पिशवी ही १० रुपयांच्या नाणे टाकून मिळणार आहे. एक मशिन नगरपालिकेत आणि दुसरी बाजारात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय कापडी पिशव्या बनविण्याचे कामही भोरमधील महिलांना देण्यात येणार आहे.
- निर्मला आवारे, नगराध्यक्षा, भोर नगरपालिका.
01425