शेतकरी, कामगारांसाठी लढणारा अधिकारी

शेतकरी, कामगारांसाठी लढणारा अधिकारी

शेतकरी, कामगारांसाठी लढणारा अधिकारी

सहकारी संस्था ही शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठीच असते, याची जाणीव ठेवून त्यांचे हीत जोपासत कामकाज करणारे भोरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचे सेवक म्हणून काम करीत आहेत. शासनाच्या सहकार क्षेत्रात ३० वर्षांपासून काम करताना त्यांनी अनेक कामगारांचा उघड्यावर आलेला संसार सावरण्यास मदत केली आहे. ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी चोख सेवा बजावली आहे.
-बाळासाहेब तावरे, सहाय्यक निबंधक, भोर

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मूळचे असलेले बाळासाहेब मुरलीधर तावरे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोरगावमध्येच पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील शाहू कॉलेजमधून एम. कॉम आणि एलएलबीची पदवी घेतली. १९९४ला ते मंचर (जि. पुणे) येथे सहकार विभागाच्या सहकारी अधिकारी श्रेणी १ म्हणून त्यांनी नोकरीस सुरुवात केली. त्यांनी पुणे व सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी सहाय्यक निबंधक म्हणून काम पाहिले आहे. महेश नागरी सहकारी बँकेचे विशेष वसुली अधिकारी, पुणे व सातारा शहर सहाय्यक निबंधक या पदांवरही त्यांनी काम केलेले आहे. सध्या ते भोरमध्ये सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत.

प्रलंबित प्रश्न सोडविले
शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. म्हणून ते शेतकरी कामगारांचे प्रश्न सोडविण्यास सदैव तत्पर असतात. भोरमधील ३५ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या श्री मार्कंडेय हातमाग सहकारी सूतगिरणी कामगारांना फेब्रुवारी २०२४ मध्ये न्याय दिला. थकीत पगाराचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे ते कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. १९९५ला बंद झालेल्या कंपनीच्या स्क्रॅप मटेरिअलची विक्री ३० वर्षांनंतर ८३ लाखांना केली. त्यामधून ६६० कामगारांची ६१ लाख रुपयांची थकबाकी दिली. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना व्याजाची रक्कमही देण्यात येणार आहे. सध्या तावरे हे भोरमधील नेरे विभाग पतसंस्थेच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहात आहेत. पतसंस्थेची वसुली करून ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी ते झटत आहेत. शासनाच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे आठ वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्नही त्यांनी सोडविले आहेत.

भाविकांसाठी मोफत अन्नदान
शासनाच्या नागरी सहकारी बँक, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि साखर कारखान्यांच्या निवडणुका त्यांनी विनातक्रार पार पाडल्या आहेत. बाळासाहेब तावरे हे नोकरीशिवाय इतरही समाजकार्य करीत आहेत. गेल्या २२ वर्षांपासून ते पंढरपूरच्या पायीवारीसाठी जाणाऱ्या भाविकांना मोफत अन्नदान करतात. मित्रांच्या मदतीने ते आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहेत. कोविडच्या काळात त्यांनी सातारा शहरात मार्केट कमिटीसाठी केलेले काम नागरिकांच्या अजूनही लक्षात आहे.

अडचणी सोडविण्यास नेहमीच कार्यरत
२०१९ मध्ये सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून दोन हजार ब्लँकेट्स वाटले आणि सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना २० टन गव्हाचे वाटप केले. तावरे यांना उत्तम काम करीत असल्याबद्दल शासनाने दोन वेळा वेतनवाढ केलेली आहे. त्यांच्या नोकरी व समाजसेवेच्या कामात त्यांची पत्नी वर्षा नेहमीच मदत करतात. कामगारांच्या आशीर्वादामुळे मुलगा सिद्धांत हा आर्यलॅंडमध्ये फायनान्समध्ये मास्टर डिग्री (एमएस)चे शिक्षण घेत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. गृहनिर्माण सोसायट्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच कार्यरत आहेत. भोरमधील नेरे विभाग पतसंस्थेच्या ठेवीदारांचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com