शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला भोर तालुका
भोर, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १९) पहाटेपासून तालुक्यातील रायरेश्वर आणि रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्यावरून शेकडो शिवज्योती मार्गस्थ झाल्या. शिवज्योत घेऊन जात असलेल्या शिवप्रेमींकडून केलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने आणि वाद्यांच्या आवाजाने भोरचा परिसर दुमदुमून गेला. येथील सकल मराठा समाजाकडून शिवज्योती घेऊन जाणाऱ्यांसह सर्व शिवप्रेमींना चहा व पोहे यांचे मोफत वाटप केले. केवळ शिवप्रेमी मंडळांचे कार्यकर्तेच नव्हे तर महिला मंडळे, शाळा-महाविद्यालये आणि चिमुकल्यांच्या मंडळांमधील शिवप्रेमींनी शिवज्योती नेल्या.
मंगळवारी (ता. १८) सायंकाळपासूनच शिवप्रेमींनी गडावरून शिवज्योती आपापल्या ठिकाणी घेऊन जाण्यास सुरुवात केली. शहरातील चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी पहाटेपासूनच ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. चौपाटी परिसरातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून फुलांची आकर्षक सजावट केली. शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी अनवाणी पायाने शिवज्योती आपल्या मंडळापर्यंत पोचण्यासाठी धावत होते. शिवज्योतीसोबत दुचाकी, चारचाकी, खासगी बस आणि ट्रकमधूनही शिवप्रेमींचा प्रवास सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वर किल्यावर स्वराज्याची शपथ घेतली असल्यामुळे रायरेश्वरावरून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवप्रेमींची संख्या जास्त आहे. भोर शहरातील चौपाटी परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ रायरेश्वर व रोहिडेश्वरावरून घेऊन आलेल्या शिवज्योतींचे विधीवत पूजन केले. त्यानंतर शिवाजी महाराजांना वंदन करून शिवज्योती आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या. केवळ भोर तालुक्यातीलच नव्हे तर पुणे व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधील शिवमंडळांचे कार्यकर्ते शिवज्योत घेऊन आपल्या गावाकडे गेले. सकल मराठा समाजातर्फे बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे पोहे आणि चहा दिला. दिवसभर शिवप्रेमींसाठी थंड पाण्याची सोय केली होती. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजय भेलके, दीपक शेटे, अप्पा मळेकर, युवराज जेधे आदींसह सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

