पाणंद रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांत समाधान
भोर, ता. ९ : भोलावडे महसूल मंडलातील गवडी व म्हाळवडी येथील सुमारे ५० वर्षांपूर्वीचे पाणंद रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांना शेतात जाण्यासाठी आणि जनावरांसह इतर साहित्यांच्या वाहतुकीसाठीचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाणंद रस्ते आणि शीव रस्ते मोकळे करण्यासाठीचे अभियान सुरू झाले आहे.
भोर तालुक्यात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांच्यासोबत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत गावांना भेटी दिल्या व शेतकऱ्यांशी चर्चा करून संबंधित रस्ता हा पाणंद रस्ता किंवा शिव रस्ता असल्याचे जाहीर करण्यात आले.
गवडी येथील हेळजाईमाता मंदिरापासून ते देशमन दांड या ठिकाणापर्यंतचा सुमारे दीड किलोमीटर अंतराचा पाणंद रस्ता प्रथमच खुला करण्यात आला. या रस्त्याचा उपयोग शिंद, गवडी व नानाची वाडी या गावांना व वस्त्यांमधील शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी गवडीच्या सरपंच विमल साळुंखे, तलाठी संभाजी मोरे, विमल शिंदे, काशिनाथ साळुंके, पोलिस पाटील शांताराम साळुंखे, किरण कोंढाळकर, संपत साळुंखे व अरविंद साळुंखे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
म्हाळवडी (ता.भोर) येथे रस्ता खुला करताना मंडलाधिकारी समीर मुलाणी, ग्राममहसूल अधिकारी अमोल सूर्यवंशी, सरपंच दत्तात्रेय बोडके, सर्जेराव बोडके ग्रामविकास अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जुने पाणंद रस्ते खुले झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठीचा हक्काचा मार्ग मिळाला आहे. यामुळे वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांना येताजाता होणारा त्रास बंद होणार आहे. याशिवाय रस्त्यावरून गावात होणारे वादही थांबणार आहेत.
- काशिनाथ साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य, गवडी
05036
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

