

भोर, ता. २८ : नवीन शैक्षणीक धोरणातील संचमान्यतेच्या (आकृतिबंधाच्या) निकषानुसार भोर तालुक्यातील सुमारे ६७ पदवीधर शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्याच्या दुर्गम भागातील ५४ शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या दीड हजारांहून जास्त विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. सध्या भोर तालुक्यात २७० प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची मंजूर संख्या १७९ आहे. त्यापैकी १४० पदवीधर शिक्षक कार्यरत असून ३९ पदवीधर शिक्षक रिक्त आहेत. मात्र नवीन निकषांनुसार पदवीधर शिक्षकांची संख्या ही ७३ राहणार आहेत. नवीन निकषांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या (उच्च प्राथमिक) २० पट पटसंख्या असलेल्या शाळेवर २ पदवीधर शिक्षक असणार आहेत. तालुक्यातील सहावी ते आठवीपर्यंतच्या ९० शाळांपैकी केवळ ३६ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ही २० पेक्षा जास्त आहे. मात्र ५४ शाळामध्ये ही पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. म्हणून त्या ठिकाणी पदवीधर शिक्षकांची नेमणूक केली जाणार नाही. त्यामुळे सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. परंतु तालुक्याच्या ग्रामीण भागात जवळपास उच्च प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळाच नाहीत, आणि असल्या तरीही वाहतूक व इतर व्यवस्था नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर विद्यार्थ्यांना इतर शाळेत जाता आले नाही तर त्याच शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षकांना सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. संबंधित शाळेवरील शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार होणार आहे.
सध्या तालुक्यात पहिली ते चौथी आणि पहिली ते सातवी पर्यंतच्याच शाळा आहेत. नवीन आकृतिबंधानुसार पहिली ते पाचवी आणि पहिली ते आठवी अशी रचना असणार आहे. तालुक्यात उदयखानवाडी व मानटवस्ती या दोन्ही शाळांमध्ये अजून एकही शिक्षक नाही.
भोर तालुक्यातील शिक्षकांची संख्या
मंजूर संख्या २०२३-२४ २०२४-२५
शाळांची संख्या २७० २६८
उपशिक्षक ५७६ ५६७
पदवीधर शिक्षक १७९ ७३
मुख्याध्यापक ७ ७
एकूण १०३२ ९१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.