

भोर, ता. २४ : हातचलाखीने एटीएमची अदलाबदल करून बँकेच्या एटीएममधून ५१ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहा ते सोमवारी (ता. १२) सकाळी १० या वेळेत घडली. याबाबत सचिन विष्णू सणस (वय ४५, रा. भोलावडे, मूळगाव-रावडी, ता. भोर) यांनी फिर्याद दाखल केली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सचिन सणस हे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पत्नीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे एक तरुण उभा होता. त्यांना एटीएममधून पैसे कसे काढायचे हे माहिती नसल्यामुळे त्यांनी त्या तरुणास पैसे काढण्यासाठी मदतीस बोलावले. त्या तरुणाने हातचलाखीने स्वतः जवळ असणारे डुप्लिकेट कार्ड एटीएममध्ये टाकले. त्यामुळे पैसे निघाले नाहीत आणि पैसे निघत नसल्याचे कारण सांगून डुप्लिकेट एटीएम सणस यांना दिले.
सणस घरी गेल्यानंतर त्यांना त्याच दिवशी रात्री पैसे काढल्याचा मेसेज आला. परंतु त्यांना नीटसे समजले नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी पैसे काढल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तर त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे समजले. त्यांनी स्वतः जवळ असणारे एटीएम तपासले असता ते डुप्लिकेट असल्याचे समजले आणि मूळ एटीएम हे संबंधित तरुणाकडे गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी (ता. २३) रात्री भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सणस यांना फसविणारा तरुण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस उपनिरीक्षक शीला खोत पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.