सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस हतबल
भोर, ता. ६ : शहरासह तालुक्यातील ११८ गावांसाठी भोर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २९ असल्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. पोलिसांची ५० टक्के पदे रिक्त असल्यामुळे गुन्ह्यांचा तपास संथगतीने सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस हतबल होताना दिसत आहेत. त्यामुळे भोरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ड्युटीवरील पोलिसांना नियमापेक्षा अधिक वेळ काम करावे लागत आहे.
भोर पोलिस ठाण्याअंतर्गत भोर शहरासह हिर्डोशी, पसुरे, उत्रौली व वेनवडी या पाच बीट मध्ये एकूण ११८ गावे आहेत. यामध्ये अ वर्ग प्रकारातील १० आणि ब वर्ग प्रकारातील १०८ गावे आहेत. याशिवाय भाटघर व नीरा-देवघर धरणे, वरंधा आणि अंबाडखिंड घाट, रायरेश्वर आणि रोहिडेश्वर किल्ला, शहरातील भोरेश्वर, वाघजाई व जानाई मंदिर, वरंधा घाटातील वाघजाई मंदिर, आंबवडे येथील नागेश्वराचे मंदिर, अंबाडे येथील जानाईदेवी इत्यादी प्रमुख मंदिरे आहेत. तालुक्यातील वरंधा घाट, हिर्डोशी खोरे, वेळवंड खोरे आणि आंबवडे खोऱ्यातील अतिदुर्गम भागातील काही गावांमध्ये मोबाईलची रेंजही नाही. अशा ठिकाणी गुन्हे किंवा अपघात झाल्यास तिथपर्यंत पोहोचण्यास कित्येक तास लागतात. त्यातच पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेवर होत नाही.
भोर पोलिस ठाण्यात अधिकारी व पोलिसांच्या मंजूर ५८ पदांपैकी २९ पदे रिक्त असून केवळ २९ जणच कार्यरत आहेत. ठाण्यात ३ अधिकारी, १२ पोलिस हवालदार, चार सहाय्यक फौजदार आणि ३९ पोलिसांची पदे मंजूर आहेत. मात्र सद्यःस्थितीत पोलिस ठाण्यात ८ हवालदार, १ साहाय्यक फौजदार आणि १९ पोलिस शिपाई कार्यरत आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गुन्ह्यांचा तपास करताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे भोर तालुक्यातील पोलिस ठाण्यांमधील रिक्त जागांसदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- अण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक, भोर पोलिस ठाणे
दृष्टिक्षेपात सध्याची स्थिती
१. दैनंदिन कामांशिवाय रात्रीची ड्युटी, इतर ठिकाणचा बंदोबस्त, व्हीआयपी बंदोबस्त
२. न्यायालयीन कामांसाठी पोलिसांची वानवा
३. दरवर्षी भोर पोलिस ठाण्यातील रिक्तपदांची संख्या वाढतेय
४. मागणी करूनही पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून पुरेसे पोलिस मिळत नाही
५. तालुक्यातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त
भोरमध्ये येण्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नकार
भोर पोलिस ठाण्याअंतर्गत दुर्गम आणि डोंगरांचा भाग असून गुन्ह्यांची संख्या कमी आहे. याशिवाय पोलिसांना हव्या त्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यामुळे भोरला बदली झालेले पोलिस कर्मचारी येण्यास नकार देत आहेत. भोरमधून बदली झालेल्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या जागी बदली होऊन आलेले अनेक जण भोरला हजर न होता इतर पोलिस ठाण्यात बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
भोर पोलिस ठाण्यातील पोलिसांची संख्या
पद मंजूर संख्या कार्यरत रिक्त
अधिकारी ३ ३ ०
पोलिस हवालदार १२ ८ ४
साहाय्यक फौजदार ४ १ ३
शिपाई ३९ १७ २२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.