भोरमध्ये ९१ टक्के भात लागवड

भोरमध्ये ९१ टक्के भात लागवड

Published on

भोर, ता. ४ : भोर तालुक्यात यंदा भाताची लागवड ९१ टक्के झाली आहे. खरीप हंगामात बाजरी, नाचणी, मका या तृणधान्यांसह कडधान्यांची ८२ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दिली. याशिवाय भुईमूग व सोयाबीन या तेलबियाणांची ७१ टक्के पेरणी झाली आहे.
तालुक्यात शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले असल्याचेही धर्माधिकारी यांनी नमूद केले. यंदा मुसळधार पावसामुळे भातलावण्या व पेरण्या करण्यास उशीर झाला. तालुक्यात कृषी विभागाअंतर्गत प्रकल्प व प्रमाणित बियाणे वितरणासाठी यावर्षी सोयाबीनचे पाच हजार किलो व भुईमुगाचे १२ हजार ५०० किलो बियाणे प्राप्त झाले आहे. यापैकी सोयाबीनचे २ हजार २५० किलो बियाणे हे तीन प्रकल्प गटामार्फत तर दोन हजार ७५० किलो बियाणे हे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज केलेल्या ८४ शेतकऱ्यांना प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वाद्वारे वितरित करण्यात आले.

तालुक्यातील पाच प्रकल्प गटांना भुईमुगाचे ५ हजार किलो बियाणांचे वितरण केले असून प्रमाणित बियाणे वितरणाअंतर्गत १५२ शेतकऱ्यांना पाच हजार ७४० किलो बियाणांचे वितरण केले आहे. उर्वरित १ हजार ७६० किलो बियाणांचे वितरण सुरू आहे. राष्ट्रीय गळीत धान्य कार्यक्रमाच्या मार्गदर्शनानुसार २४.८० टक्के लाभार्थी हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील आहेत.

शासनाने प्रथमच शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वाटप कार्यक्रम ठरविलेला होता. त्यानुसार तालुका कृषी विभागाकडे गोदाम नसल्यामुळे बियाणे कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडे ठेवण्यात आले होते. हे ठिकाण रस्त्यालगत असल्याने शेतकऱ्यांना वाटप करणे सोयीचे झाले. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने शेतकऱ्यांना बियाणे वेळेकर मिळाले आहेत.
- शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी

Marathi News Esakal
www.esakal.com