भोरमध्ये रस्त्याच्या निधीवरून श्रेयवादाची लढाई
भोर, ता. ७ : भोर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शंकर मांडेकर आणि पूर्वीचे कॉग्रेसचे परंतु सध्या भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भोर, राजगड आणि मुळशीतील विकासकामांबरोबर जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या निधीच्या मंजुरीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
माजी आमदार थोपटे व संजय जगताप व भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी गुरुवारी (ता. ४) धांगवडी (ता. भोर) येथे पत्रकार परिषद घेऊन जानेवारी महिन्यात होणाऱ्या पुणे ग्रॅंड चॅलेंज सायकल स्पर्धेच्या रस्त्यांवरील सायकल ट्रॅकसाठी भोर-राजगड-मुळशीसाठी १२१ कोटी आणि पुरंदर-हवेलीसाठी ११४ कोटींचा निधी राज्य सरकारकडून मिळणार असल्याचे सांगितले. यावर आमदार मांडेकर यांनी शनिवारी (ता. ६) भोरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सायकल स्पर्धेला देण्यात येणारा निधी हा महायुतीच्या सरकारकडून म्हणजे अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्हा नियोजन मंडळ आणि पीएमआरडीए यांच्याकडून मिळाला असल्याचे सांगितले. तसेच, भोर शहर मॉडेल बनविण्यासाठी एकदा आमच्याकडे सत्ता द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, यशवंत डाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर रविवारी (ता. ७) माजी आमदार थोपटे यांनी पत्रकार परिषद घेत विकासकामांचे श्रेय घेत असल्याचे आरोप फेटाळले. उलट मी आमदार असताना आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आमदार शंकर मांडकर घेत असल्याचे विकासकामांच्या गावांसहीत थोपटे यांनी सांगितले. जानेवारीत होणारी जागतिक सायकल स्पर्धा ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी (भाजप) यांची आहे. आणि ही स्पर्धा राबविण्यासाठी राज्य सरकार निधी देणार आहे. रस्ते व सायकल ट्रॅकसाठी २३५ कोटींचा निधी भोर मतदारसंघात येणार असल्याचे बहुधा त्यांना आमच्याकडूनच समजले. भोर शहरातील जनेतेने तुम्हाला १० वर्षांपूर्वीच नाकारले आहे. यापुढे लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगावे आणि व्यक्तीगत टीका करून माझा अपप्रचार करणे थांबवावे, अन्यथा तुमच्या भाषेत उत्तर देण्यात येईल, असा इशाराही थोपटे यांनी दिला.
यावेळी पोपट सुके, जीवन कोंडे, पल्लवी फडणीस, संतोष धावले, रवींद्र कंक, विठ्ठल आवाळे, विश्वास ननावरे, सचिन हर्णसकर, गणेश पवार, रोहन बाठे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार संग्राम थोपटे हे सध्या कोणत्याही पदावर नाहीत. तरीसुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची भूमिका मांडून काम करीत असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महायुतीत नव्याने दाखल झालेल्यांनी विकासकामांचे श्रेय घेऊ नये.
- शंकर मांडेकर, आमदार
आमदार प्रत्येक विकासकामांची जाहिरात करताना पालकमंत्र्यांचे नाव लिहितात, परंतु महायुतीचे नाव लिहीत नाहीत. पालकमंत्री तुमचा असला तरीही मुख्यमंत्री आमचा आहे. तुम्ही महायुतीमधून विजयी झाला, तरीही निधी मिळाल्यावर महायुतीचे नाव न सांगता फक्त पालकमंत्री अजित पवार यांचेच नाव सांगता.
- संग्राम थोपटे, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.