भोरमध्ये बंडोबांना थंड करण्याचे आव्हान
भोर, ता. २३ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भोर तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरीचे प्रमाण जास्त आहे. अर्ज माघारी घेईपर्यंत बंडखोरांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास पक्षांचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत; मात्र बंडखोर उमेदवाराने अर्ज माघारी घेतला तरीही त्यांच्या समर्थकांच्या मनात मात्र संभ्रमच राहणार आहे. बंडखोरी झाल्यास पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, यासाठी बंडखोरांनी अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. यासाठी बंडखोरांशी गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. एकंदरीत बंडोबांना थंड करण्याचे काम पक्षश्रेष्ठींना करावे लागणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ५८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. गुरुवारी (ता. २२) भोर येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये रणजित शिवतरे यांचा भोलावडे- शिंद गटातून जिल्हा परिषदेसाठी भरलेला उमेदवारी अर्ज सूचक दुसऱ्या गटातील असल्यामुळे अवैध ठरला आहे; मात्र इतर सर्व अर्ज वैध ठरले.
भोर तालुक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रित निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे वेळू-नसरापूर गटाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली आहे; मात्र इतर सर्व पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. तालुक्यातील चार गटांपैकी वेळू- नसरापूर, भोंगवली- कामथडी आणि उत्रौली- कारी या तीन गटांमध्ये पक्षांची चौरंगी लढत, तर शिंदे- भोलावडे गटात राजकीय पक्षांची तिरंगी लढत होणार आहे. याशिवाय अपक्ष व बंडखोर उमेदवारही रिंगणात असणार आहेत.
छुपी युती होणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या पदाधिकारी जोर लावत आहेत. उत्रौली- कारी गटातील निवडणूक ही सर्वाधिक प्रतिष्ठेची असल्यामुळे त्या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेळू- नसरापूर गटात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांची एकमेकांशी छुपी युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गट-गण निहाय छाननीत वैध ठरलेल्या अर्जांची संख्या
गट : वेळू-नसरापूर : १२, भोंगवली-कामथडी : ९, शिंद-भोलावडे : १०, कारी-उत्रौली : १०
गण : वेळू : ९, नसरापूर : ६, भोंगवली : १४, कामथडी : ८, भोलावडे : ७, शिंद : ६, उत्रौली : ५, कारी : ३.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

