
दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही गवगवा कशाला : अजित पवार
बारामती, ता. ७ : ‘‘पुण्यात बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले यांच्याऐवजी ‘सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला, ही चूक होती, त्याबद्दल मी लगेचच दिलगिरीही व्यक्त केली, मात्र त्याचा इतका गवगवा करण्याची गरज नव्हती,’ असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ते प्रथमच शनिवारी (ता. ७) बारामतीत आले होते. त्यामुळे त्यांना भेटायला सरपंच व सदस्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नवीन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. नवीन लोकांच्या हातात गावचा कारभार गेला पाहिजे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चांगले निकाल लागले. तालुक्यात दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतात. परंतु, गटातटात आम्ही पडत नाही. जो गट निवडून येईल, त्यांना मदत करायची गावच्या विकासाला हातभार लावायचा, ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण मी पुढे घेऊन जात आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांची एकदिवसांची कार्यशाळा बारामतीत आयोजित करणार आहे.’’
मोठा बंदोबस्त
अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर व शहरात झालेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणताही धोका पत्करायचा नाही, असा निर्णय घेतलेला असल्याने अजित पवार सुरक्षा यंत्रणांच्या गराड्यात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.