
भूसंपादन वेगाने करण्याच्या सूचना
बारामती, ता. ६ : नियोजित बारामती-फलटण रेल्वे मार्गासह संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूसंपादन वेगाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी (ता. ५) बारामतीत झालेल्या बैठकीत दिल्या.
या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांचे काम येत्या तीन महिन्यात मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून, ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ते स्वतः वेळोवेळी याचा आढावा घेणार आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या टप्पा एकमधील पाटस ते बारामती दरम्यान ८० टक्के भूसंपादन झालेले असून, या टप्प्याचे कामही बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. यातील उर्वरित काही भाग विवादीत असून, तेथेही बोलणी सुरु आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती-इंदापूर मार्गावरील ८५ टक्के भूसंपादन झालेले असून, काही ठिकाणी येत्या पंधरवड्यात पोलिस बंदोबस्त घेऊन काम केले जाणार आहे. काही प्रकरणे न्यायालयात असून जेथे जमीन उपलब्ध झाली आहे तेथे काम सुरु आहे.
दरम्यान, बारामती-फलटण रेल्वे मार्गाच्या १८३ हेक्टरपैकी सहा हेक्टर ही सरकारी जमीन असून, त्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. उर्वरित १७७ हेक्टरपैकी १२८ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झालेले असून, आता उर्वरित ४९ हेक्टरचे भूसंपादन आगामी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे कांबळे यांनी सांगितले. रेल्वेच्या भूसंपादनासाठीचे ६८ कोटी रुपये अजूनही शिल्लक असून गरज पडल्यास रेल्वे विभाग त्वरित निधी उपलब्ध करून देत असल्याने या कामात निधीची अडचण भासणार नसल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प
बारामती-फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर बारामती-फलटण लोणंद-मिरज मार्गे दक्षिण भारताला दौंड ते व्हाया बारामती-मिरजपर्यंत अधिक जलद गतीने जाता येणार आहे. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळणार असल्याने हा प्रकल्प बारामतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे पालखी मार्गामुळे दौंड व पाटसहून बारामतीला येणारा तसेच बारामतीहून इंदापूरला जाणारा रस्ता अधिक उत्तम होणार असून, ही शहरे त्यामुळे अधिक जवळ येणार आहेत.