
बारामती येथे रंगणार कारभारी प्रिमिअर लीग
बारामती, ता. ७ : येथील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुका क्रिकेट संघटनेच्यावतीने २०-२० ‘‘कारभारी प्रिमिअर लीग २०२३’’ सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे लीगचे प्रमुख प्रशांत नाना सातव यांनी याबाबत माहिती दिली.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर २० ते २९ एप्रिल दरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. लेदर बॉलवर होणाऱ्या या सामन्यांसाठी तयारी सुरु केली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना ग्रामीण भागात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी अधिकाधिक सामन्यांचे आयोजन करण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. त्या दृष्टीने रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोठ्या प्रिमिअर लिगचे आयोजन केल्याचे प्रशांत सातव यांनी नमूद केले.
दरम्यान या लिगमध्ये सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत सहभाग असावा व या स्पर्धेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मान्यता मिळावी याचे निवेदनही रोहित पवार यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. फक्त बारामती तालुक्यातील खेळाडूचे या लिगसाठी पात्र ठरणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रशांत नाना सातव ९६०४२२४२४२ किंवा सचिन माने ९०९६८३११८३ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.