
बारामतीत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
बारामती, ता. ११ : तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध विधायक उपक्रमांचे आयोजन केले गेले. महिला व युवतींना स्वसरंक्षणार्थ लाठी काठी, दांडपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील नटराज नाट्य कला दालनामध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच मराठा आरमार व जलदूर्ग यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित केले होते.
दरम्यान, शिवचरित्रातील विविध विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. याला मोठा प्रतिसाद लाभला. भक्ती शक्ती संगम हा अभंग, भारुड, शिवगीतांचा अवधूत गांधी आळंदीकर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामतीच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांचा महाराणी येसूबाई या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या शिवाय समितीच्या वतीने शिवगौरव पुरस्कारांचेही वितरण या वेळी केले गेले.
वृक्षारोपण व पर्यावरणात काम करणारे समीर बनकर, कण्हेरीचे मठाधिपती कोकाटे महाराज, गोवंश रक्षणात कार्यरत असलेले शिवशंकर स्वामी यांना शिवगौरव पुरस्कार प्रदान केला गेला.
यंदा शिवरायांची पारंपरिक पद्धतीने पालखीतून शहर प्रदक्षिणा काढण्यात आली होती. रोहन शेरकर, रोहन ढवाण, सुदीत तावरे, सागर जाधव, संदीप मोहिते, संदीप जाधव, चारुदत्त काळे, अमोल मासाळ आदींनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.