बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’वरील विश्‍वास कायम

बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’वरील विश्‍वास कायम

बारामती, ता. २९ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत आपली पकड मजबूत केली. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे मजबूत पकड आहे. मात्र, भाजपने यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत उमेदवार दिले होते. मतदारांनी भाजपला नाकारत पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर विश्वास व्यक्त केला आहे.
यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले होते. या निवडणुकीत भाजपने आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर राष्ट्रवादीनेही ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती. गाफील न राहता निवडणूक जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल, ते सर्व राष्ट्रवादीने केले. वर्चस्व असले तरी गाफिल न राहता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला.
बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद नाहीत, असे अजिबात नाही. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांना एकत्र करण्याची किमया अजित पवार हे साधतात. ज्या इच्छुकांना संधी मिळाली नाही किंवा जुन्या काही चेहऱ्यांना सामावून घेता आले नाही, तरी ती नाराजी मतदानात दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. अनेकांशी स्वतः अजित पवार बोलले व नाराजी दूर करत त्यांना प्रचारात सामावून घेतले. अनेक ठिकाणी अजित पवार हेच उभे आहेत असे समजून काम करा, हा संदेशही देण्यास ते विसरले नाहीत. या निवडणूकीसाठी मेळावा घेण्यासोबत प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी रणनीती निश्चित केली. राष्ट्रवादीमध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लावण्यासोबतच कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढविण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट विजयात सर्वात महत्त्वाचे होते. आपल्या घरचे कार्य असल्याप्रमाणे असंख्य कार्यकर्त्यांनी एकेका मतासाठी जिवाचे रान केले. रात्रंदिवस काम केले, त्याचा सामूहिक परिणाम राष्ट्रवादीच्या विजयात दिसला.

भाजपकडून आव्हानाचा प्रयत्न
भाजपने यंदा निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, या भूमिकेतून उमेदवार उभे केले. त्यांनीही एकास एक उमेदवार देत लढत देण्याचा निकराचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उमेदवार मिळवून निवडणूक लढविणे हे काम तसे सोपे नव्हते. मात्र, भाजपच्या मोजक्या शिलेदारांनी हे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अशा निवडणूका कायम महत्त्वाच्या ठरतात. एकीकडे खुद्द अजित पवार यांच्याच भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. त्यात भाजपच्या मोजक्याच नेते व कार्यकर्त्यांनी जिद्दीने निवडणूक लढवून आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न दखल घेण्याजोगा होता.

मजबूत पकड कायमच
या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांची बारामतीवरची पकड अजूनही किती मजबूत आहे, याचाच प्रत्यय आला. दोन चेहरे वगळता इतर सर्व सोळा नवीन चेहरे देत त्यांना निवडून आणण्याची किमया पवार यांनी करून दाखवली. इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत या पूर्वी नव्या जुन्यांचा मेळ घालून उमेदवार द्यायची प्रथा यंदा प्रथमच अजित पवार यांनी मोडीत काढली. पक्ष संघटनेसाठी वेळ न देणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. कितीही मोठा पदाधिकारी असला, तरी त्याचा कार्यक्रम अजित पवार करू शकतात व त्याच्या जागी नवख्या उमेदवारालाही निवडून आणू शकतात, हेच बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने स्पष्ट झाले. विकासाच्या मुद्यावर अजित पवार यांच्यावर असलेला बारामतीकरांचा विश्वास या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com