

मिलिंद संगई
बारामती, ता. २४ : ‘‘बारामतीच्या सर्वच सन्माननीय मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवीत मला आठव्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. जिरायती बारामती ही ओळख पुसून टाकण्याचा माझा प्रयत्न आहे, आगामी पाच वर्षांच्या काळात बारामतीला देशातील सर्वोत्तम मतदारसंघ बनविण्याचे माझे स्वप्न आहे,’’ असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार आठव्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. बारामतीच्या विकासाचे त्यांचे व्हीजन काय असेल, याबाबत ‘सकाळ’ने साधलेला संवाद.
पुढील पाच वर्षांच्या मतदारसंघात विकासाच्या अजेंड्याबाबत अजित पवार म्हणाले, ‘‘आगामी पाच वर्षांच्या काळात बारामतीला देशातील सर्वोत्तम मतदारसंघ बनविण्याचे माझे स्वप्न आहे. विकासाचे प्रकल्प राबविण्यासोबतच रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांची निर्मिती, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, सौरऊर्जेच्या वापरावर भर देणे, स्वयंरोजगाराच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न करणे, आरोग्याच्या अधिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.’’
‘‘आजपर्यंत सात वेळा मी आमदार झालो आहे. या काळात विविध राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्रिपदासह उपमुख्यमंत्रिपदापर्यंत वाटचाल झालेली आहे. या काळात सिंचन, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यांसारख्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक केली. विविध शासकीय विभागांची सुंदर कार्यालये बारामतीत निर्माण केली आहेत. काम झाले असले तरी अजूनही सगळी कामे मार्गी लागली आहेत, असा माझा दावा नाही. राहिलेली कामे या पाच वर्षांच्या काळात पूर्ण करणार आहे. कऱ्हा नीरा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’’
प्रलंबित प्रश्नांची यादी करणार आहे. त्यात प्राधान्यक्रम निश्चित करणार असून, कालबद्ध कार्यक्रम हाती घेत, हे प्रश्न मार्गी लावले जातील. सुदैवाने राज्यात व केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्याने निधीची अडचण भासणार नाही. हे प्रश्न प्रशासकीय मदत घेऊन सोडविले जातील. अनेक विषयांवर पुढील पाच वर्षांत काम करायचे आहे. त्या दृष्टीने येत्या काही दिवसांत तसे नियोजन केले जाईल, ठरावीक कालमर्यादेत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्व घटकांना सोबत घेऊन मी काम करणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
विकासाचा अजेंडा
पुढील पाच वर्षांतही मूलभूत सुविधा निर्मिती
रेल्वेसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती
कॅन्सर हॉस्पिटल निर्मिती
सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन
जिरायती भागाचा पाणीप्रश्न सोडविणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.