ऊसशेतीत एआय वापराबाबत शनिवारी बारामतीत कार्यशाळा

ऊसशेतीत एआय वापराबाबत
शनिवारी बारामतीत कार्यशाळा
Published on

बारामती, ता. १० : उसाची उत्पादकता वाढवण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न व उत्पादन मिळविण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रभावी वापर कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासह सविस्तर माहिती देण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरघोस ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचे आधुनिकरणासाठी वापर’ या कार्यशाळेचे शनिवारी (ता. १५) बारामतीत आयोजन केले आहे.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन राज्यातील सर्व प्रमुख सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित केले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून साडेअकरापर्यंत प्रात्यक्षिक पाहणी व त्यानंतर शारदानगर शैक्षणिक संकुलातील मंथन सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‍घाटन होणार असून, या प्रसंगी ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्रतापराव पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी उपस्थित असतील.
दरवर्षी हवामान बदलाचा मोठा फटका ऊस पिकास बसतो. त्यातून उत्पादन घटण्यासोबतच ऊस उत्पादकांनाही त्याचा मोठा तोटा सहन करावा लागतो. कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे एकरी खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड या संस्थांच्या मदतीने काही प्रयोग केले. त्याचे यश लक्षणीय आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच साखर कारखान्यांकडून अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, असा ट्रस्टचा प्रयत्न आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांच्यासह जागतिक स्तरावरील उद्योजक इलॉन मस्क यांनीही या संशोधनाची दखल घेतली आहे. कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्याची सुरवात कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापराने सुरु झाली आहे. त्याचा लाभ राज्यभरातील सहकारी व खासगी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच ऊसउत्पादकांना व्हावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

राज्य शासनही आग्रही
नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी दोन वर्षात पाचशे कोटी रुपये अनुदान राज्य सरकार देणार असल्याची घोषणा करत हा प्रकल्प शासनस्तरावरही तितकाच महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले आहे.

नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार
या कार्यशाळेत कृत्रीम बुद्धीमत्तेसोबतच कारखानदारीसाठी राख विलगीकरण, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, स्फुरदयुक्त सेंद्रीयखत निर्मिती, पाचटापासून बायोचार, वीजनिर्मिती करणारे छोटे यंत्र, इंधनबचत व जलशीतकरण, स्पेंटवॉशवर प्रक्रीया करणारे तंत्रज्ञान, कौटुंबिक बायोगॅस संयंत्र व गांडूळखत प्रकल्प तयार करणे, इथेनॉल, अल्कोहोल तयार करण्याची नावीन्यपूर्ण पद्धती व पुरवठा साखळी व्यवस्थापन याबाबत अमेरिका आर्यलँड, इंग्लंड व दुबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com