शंभर दिवसात पारदर्शक कारभाराचा प्रयत्न

शंभर दिवसात पारदर्शक कारभाराचा प्रयत्न
Published on

बारामती, ता. १२ : ‘‘महसूल विभागाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने गेल्या शंभर दिवसात अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. वेगवान व पारदर्शक कारभार करण्यावर या पुढील काळातही महसूल विभागाचा भर असेल,’’ असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
सरकार स्थापनेनंतर गेल्या शंभर दिवसात केलेल्या विविध कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नावडकर व शिंदे बोलत होते. डिजिटीलायझेशनकडे वाटचाल सुरू केली असून, लोकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, या उद्देशाने ११ बाबींसाठी या पुढील काळात ग्रामस्थांना तलाठी यांच्याकडे जाण्याची गरज नाही. ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ग्रामस्थांनी अर्ज केल्यास नोंदीसह इतर कामे मार्गी लागणार आहेत.
बारामती उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्याकडे येणाऱ्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून सर्व पत्रव्यवहाराचे ई- ऑफिसमध्ये रूपांतर करण्यात आले आहेत. अर्जदारांनी ईमेल दिल्यास त्यांच्या ईमेलवर उत्तरही पाठविण्यात येणार आहे.

प्रत्येक कर्मचारी व विभागाकडे असलेल्या प्रलंबित अर्जांची माहिती संगणकावर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना यामुळे प्राप्त होऊ लागली आहे. शेतकऱ्यांचे युनिक ओळखपत्र काढण्यासाठी जोर लावण्यात आला असून, आतापर्यंत ४९९९४ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे नावडकर यांनी नमूद केले.

उर्वरित भूसंपादन लवकरच करणार
बारामती फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या १९१ हेक्टरपैकी १६८ हेक्टर भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित किरकोळ भूसंपादन येत्या काही दिवसात पूर्ण होईल. बऱ्हाणपूर ते बारामती व बारामती ते फलटण रस्त्याच्या कामासाठी जमिनी व वास्तूंचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
रेल्वे भूसंपादनासाठी २६१ कोटी ३५ लाख, संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी १२३२ कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे.

सौर कृषीउर्जा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी कामे
मुख्यमंत्री सौरकृषीउर्जा योजनेअंतर्गत बारामती तालुक्यात मुरूम, जळगाव सुपे व कण्हेरी येथे सौरऊर्जा पॅनेल उभारण्यासाठी जागा देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत लोकांना सौरऊर्जा प्रकल्प देण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

मेळावे घेत जातीचे दाखले दिले
ज्या समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळत नाही, अशांना दाखले देण्यास प्रारंभ केला असून, मेळावे घेत दाखले दिले जात आहेत. आजपर्यंत गेल्या वर्षभरात या कार्यालयाकडून ४९७९९ जातीचे दाखले दिल्याचेही नावडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com