सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व - अजितदादा पवार
सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व - अजितदादा पवार
श्री. जगजित इंद्रजित निंबाळकर, को-फाउंडर, एन.एस.ओ. वर्ल्ड, पुणे
काही व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्वव्यापी नेतृत्व करीत असतात. समाजासाठी सातत्याने काहीतरी चांगले करावे, दिशा मिळावी, लोकांचे राहणीमान उंचवावे, सर्वांगीण विकास व्हावा या ध्येयाने त्यांची सातत्याने वाटचाल सुरू असते. स्वत:सोबतच सर्वांना घेऊन चालत अशा व्यक्ती वाटचाल करीत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाटचालीचा प्रभाव असंख्य लोकांवर पडतो. असेच एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाहावे लागेल.
अगदी लहानपणापासूनच मी अजितदादांना पाहत आलो आहे. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व, करारी स्वभाव, आवाजातील धार आणि त्यांचा एकूणच प्रशासनावर असलेल्या प्रभाव या बाबी मला कायमच भावल्या. एक नेता कसा असावा तर तो अजितदादांसारखाच असावा असे कायमच मला वाटत आले. त्यांच्या निर्णयक्षमतेसह त्यांचा बेधडक स्वभाव, स्वच्छता आणि टापटीप यांची असलेली आवड या सगळ्या गोष्टी मला मनापासून आवडायच्या. माझे मेन्टॉर असल्यासारखीच ही स्थिती होती.
आमच्या घरात निवडणूक म्हणजे केवळ राजकारणाचा काळ नसतो तर तो आमच्या परंपरेचा, नात्यांचा व एकमेकांशी असलेल्या निष्ठेचा उत्सव असतो. बाळासाहेब कदम (मामा) यांनी सुरू केलेली ही परंपरा माझे डॅडी इंद्रजित सरकार निंबाळकर यांनी आजवर जिव्हाळ्याने जपली आणि घट्ट करून ठेवली आहे. माझ्या मनात दादांचे वेगळंच स्थान आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी, घरातून निघणारे डॅडी, त्यांच्या उत्साहात सामील होणारे कुटुंबीय आणि राहुल मामा, संजय काका, समज्ञा आत्या यांचे कार्य यामुळे दादांप्रती असलेली निष्ठा अनुभवता आली. ही केवळ राजकीय बांधिलकी नव्हे ती संस्कारांची, आदर्शांची, आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची शिकवण आहे असेच मला कायम वाटत आले आहे.
काही प्रसंगामुळे माझ्या मनातील दादांचे स्थान अधिक मजबूत झाले. त्या पैकी एक म्हणजे चिंतामणी ज्वेलर्सच्या उद्घाटनाचा प्रसंग याचे मूर्तिमंत उदाहरण. दुकानांचे सौंदर्य सर्वांच्या कौतुकाचा विषय असताना, अजितदादांनी वरच्या मजल्यावरच्या जिन्यावरून जाताना लगेच ओळखलं की, मार्बलचे तुकडे नीट बसवलेले नाहीत आणि काही ठिकाणी किरकोळ तडे आहेत. त्यांनी अगदी मोजक्या, स्पष्ट शब्दांत हे लक्षात आणून दिले. कामातील बारकाई, प्रत्येक गोष्ट नीटच हवी असलेला आग्रह घरातील प्रत्येकाला ‘सर्वोत्कृष्टता म्हणजे काय याचा खरा अर्थ शिकवतो. लहान तपशिलांकडे दुर्लक्ष न करता, कोणतीही गोष्ट संपूर्णपणे, उत्तमपणे पूर्ण करावी, हा दृष्टिकोन आमच्या जीवनातही तुमच्याकडे पाहून खोलवर रुजला आहे.
पहाटे पाच वाजता उठून रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत काम करणारा अत्यंत कष्टाळू नेता राज्यात क्वचितच असावा. प्रत्येक मिनिट हा लोकांच्या कामासाठी खर्च व्हावा, सर्वांची कामे करता यावीत, प्रत्येकाला न्याय देता यावा या साठी त्यांची धडपड आम्हाला एक नवीन ऊर्मी देऊन जाते. दिवसभरात अक्षरशः शेकडो लोकांना भेटूनही प्रत्येकाचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांचा प्रयत्न अनेकदा अचंबित करणारा असतो. आज दादांभोवती जे ग्लॅमर दिसते आहे, त्यामागे त्यांचे अपार कष्ट आहेत हे तितकेच खरे.
निवडणुकांच्या काळात उमेदवारी अर्ज दाखल करून सभा घ्यायची आणि पुन्हा सांगता सभेलाच यायचे, सगळीच निवडणूक तुमचे कार्यकर्ते आणि मतदारच हातात घेतात आणि तुम्ही लाखांच्या फरकाने निवडून येता. दादा ही किमया घडते ती तुमची बारामतीच्या मतदारांशी जी घट्ट नाळ जोडलेली आहे, त्यामुळे. बारामतीकरांचे तुमच्यावर आणि तुमचे बारामतीकरांवर जिवापाड प्रेम आहे, ते सात निवडणुकांतून सिद्ध झाले आहे. लोकसभा असो वा विधानसभा बारामतीसोबतच राज्यातील तुमचे सहकारी निवडणूक जिंकून आले पाहिजेत, या साठी तुम्ही रात्रीचा दिवस करता, पायाला भिंगरी लावल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढता.
तुमचं नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या प्रचारापेक्षा कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या यशासाठी झटता, त्यांना बळ देता, ते बघताना जाणवत खरं नेतृत्व म्हणजे स्वतःच्या नावासाठी धावणं नव्हे, तर इतरांना मोठं करण्याची, सोबत घेऊन जाणारे असते.
ही सगळी परंपरा, प्रत्येक निवडणुकीतला आनंद, आणि घरातल्या सर्वांची समर्पित साथ, या सर्वातून मला नेतृत्वाचा आणि कुटुंबाच्या आधाराचा खरा अर्थ समजला. तुमची सातत्य, शिस्त, आणि दूरदृष्टी
केवळ राजकारणात नव्हे, तर प्रत्येकाच्या जीवनात एक आदर्श ठरली आहे. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, पार्थदादा व जयदादा पवार यांचा. या वाटचालीमध्ये अनेकदा राजकीय चढउतार आले, पण या तिघांनीही दादांना कायमच खंबीर साथ दिली, त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले, त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत कुटुंबीय म्हणून ते ठाम उभे होते. दादांच्या यशामध्ये वहिनी, पार्थदादा व जयदादा यांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरता येणार नाही.
दादांच्या प्रवासात संघर्ष, संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि मनाशी प्रामाणिकपणा या सगळ्याच गुणांचा संगम आहे. कुठल्याही परिस्थितीत, सत्ता असो वा नसो, दादा कधीही जनतेपासून दुरावत नाहीत. ‘जनता दरबार’मधून कायम लोकांच्या अडचणी ऐकून, त्यांच्या प्रश्नांना तितक्याच सरळ आणि स्पष्टपणे उत्तर देत निर्णय घेताना राज्याच्या कष्टकरी जनतेचा विचार करतात.
प्रत्येकाची अडचण विचारात घेत, सामान्यांचा मोठा भाऊ बनून ते अडचणीत असलेल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अनेकदा जेव्हा कौटुंबिक स्तरावरील निर्णय घेण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते खंबीरपणे योग्य निर्णय घेत प्रश्न मार्गी लावताना दिसतात. त्यांची निर्णयक्षमता वाखाणण्यासारखी असते. क्षणात निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी करण्याचा त्यांचा स्वभाव आम्हाला कायमच आवडतो. दादा, आज वाढदिवसानिमित्त मी आणि आमचं संपूर्ण कुटुंब, फक्त आमचेच कुटुंब नव्हे, तर लाखो-करोडो महाराष्ट्रीयांच्या मनात तुम्ही मुख्यमंत्री झालेले बघावे हेच आहे. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही या राज्याची धुरा एक दिवस हाती घ्यावी हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.
युवकांनी आदर्श घेण्याची गरज
राजकारण करतानाही अजितदादा ज्या शिस्तबद्धपणे, परिश्रमपूर्वक वाटचाल करतात, पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करणे, प्रत्येक मिनिटांचा सदुपयोग करणे, महत्त्वाचे म्हणजे कोठेही कष्टाशी तडजोड न करता परिश्रम करणे हे त्यांचे गुण युवा पिढीने अनुकरण केले पाहिजेत असे आहेत. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्या प्रत्येकाने अजितदादांचा अभ्यास जवळून करायला हवा. त्यांची शिस्त, टापटीप, नीटनेटकेपणा, अभ्यास करण्याची सवय, माहिती करून घेण्याची पद्धत, दिलेला शब्द जिवापाड जपणे अशा बाबींचा अभ्यासच करायला हवा, अशी स्थिती आहे. एखादे काम कसे उभे करायचे हे अजितदादांकडून शिकायला हवे. बारामतीचा चेहरामोहरा बदलताना अजितदादांनी वेळप्रसंगी अनेकांचा वाईटपणा घेतला पण सार्वजनिक हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या शहराचा केलेला कायापालट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावलौकिक प्राप्त ठरला आहे. राजकारणात असाल किंवा नसाल तरीही एकदा बारामती बघायलाच हवी हे मात्र नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.