राज्याच्या प्रगतीचे सशक्त शिल्पकार : अजितदादा
महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचे, औद्योगिकदृष्ट्या समृद्ध आणि कृषिप्रधान राज्य आहे. या राज्याच्या विकासात अनेक नेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून त्यांची कार्यशैली, लोकांशी असलेली जवळीक, विकासाभिमुख निर्णयशक्ती आणि प्रशासनातील कुशलतेमुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत स्तंभ म्हणून उभे राहिले आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री होण्याचा त्यांचा विक्रम हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
- नीलेश कुलकर्णी, उद्योजक, बारामती.
विविध कार्यकारी सेवा सोसायटी, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद, पुणे जिल्हा बँकेचे संचालकपद, अध्यक्षपद, त्यानंतर विधानसभा, लोकसभा व पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवीत ते टप्याटप्याने यशाच्या शिखरावर चढत गेले. एका संचालकपदापासून सुरू झालेला प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचला, यात त्यांचे कमालीचे कष्ट, जिद्द व मेहनत कारणीभूत आहे.
विकासाभिमुख नेतृत्व
अजित पवार हे कार्यक्षम, थेट आणि वेळेचे भान ठेवून निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांना गती देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. पाणी ही शेतकऱ्यांची प्राथमिक गरज आहे हे ओळखून त्यांनी हजारो कोटींच्या सिंचन योजनांची अंमलबजावणी केली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात पुणे जिल्ह्यासह पश्चिम व संपूर्ण महाराष्ट्रात अनेक धरणे व सिंचन योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम देणारे निर्णय घेतले.
बारामतीचा आदर्श विकास
अजित पवार यांचे राजकीय कार्यक्षेत्र म्हणजे बारामती. त्यांनी बारामतीचा विकास एक आदर्श म्हणून घडवला. बारामतीमध्ये उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, सहकार, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती झाली. शैक्षणिक संस्था, तांत्रिक शिक्षण, कृषी संशोधन केंद्रे, आधुनिक दवाखाने आणि रोजगारनिर्मिती करणारे औद्योगिक प्रकल्प, उत्तम सुरु असलेल्या सहकारी संस्था, कृषिपूरक उद्योग, मूलभूत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला मिळालेले काम हे सगळे त्यांच्या नेतृत्वाचे फलित आहेत.
राहणीमानाचा दर्जा उंचावला....
अजित दादांच्या प्रयत्नामुळे बारामतीकरांचा राहणीमानाचा दर्जा आणि जीवनशैली सुधारली आहे. हे शहर ग्रामीण भारतात स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. बारामतीतील प्रशासकीय कार्यालयांच्या वास्तू व त्यांची रचना तालुकास्तरावरील राज्यातील कोणत्याच शहरात नसतील हे नक्की. गेल्या काही वर्षात त्यांनी एक व्हीजन नजरेसमोर ठेवत पुढील पंचवीस ते तीस वर्षांचा विचार करून सर्वच शासकीय कार्यालयांचे रुपडे पालटून टाकले आहे. बारामतीतील शासकीय कार्यालयांची रचना व त्यांचे इंटेरियर व फर्निचर पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय पाहिल्यानंतर तर बारामतीत नव्हे तर परदेशात असल्याचाच भास होतो. अल्प उत्पन्न गटातील रुग्णांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी स्वताः लक्ष घालत ही वास्तू उभारली आहे. बारामतीच्या या महाविद्यालयातून डॉक्टरांची पहिली तुकडी एम.बी.बी.एस. होऊन बाहेर पडली आहे, ही बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
प्रशासनावर नियंत्रण
अजित पवार हे ‘कामाचा माणूस’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वेळेचे काटेकोर पालन करतात, बैठकीत मुद्देसूद चर्चा करतात आणि निर्णय प्रक्रियेत विलंब टाळतात. त्यांच्या या कार्यशैलीमुळे प्रशासनात एक शिस्तबद्धता निर्माण होते. त्यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये अवास्तव
चर्चा व विचारविनिमय होत नाही, मुद्देसूद चर्चा होऊन निर्णयप्रक्रीयेपर्यंत गोष्टी लगेचच जातात, हे एक वेगळेपण म्हणावे लागेल. एखादा प्रकल्प उभारताना त्याची संकल्पना येईपासून ते प्रकल्प प्रत्यक्षात उभारण्यापर्यंत ज्या शासकीय साखळीतून जावे लागते, ती कशी पार करायची, प्लॅन, इस्टिमेट, मंजुरी, वर्कऑर्डर, निधीची उपलब्धता आणि अगदी इमारत उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठीची तरतूद इथपर्यंतच्या गोष्टी अजित पवार बारकाईने बघतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रशासकीय बाबींची पूर्तता नेमकेपणाने कशी करायची याच्यात त्यांचा हातखंडा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी अनेक योजनांचे वेळेत निर्णय करून निधीचा योग्य वापर सुनिश्चित केला आहे. जिल्ह्यांच्या दौऱ्यांमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतात, समस्या ऐकतात आणि तत्काळ उपाय करतात. केवळ कार्यालयात बसून निर्णय घेणारे हे नेतृत्व नसून, जमिनीवर उतरून काम करणारे नेते आहेत. सातत्याने लोकांमध्ये वावर असल्याने लोकांच्या समस्या, व्यथा त्यांचे प्रश्न यांची त्यांना अचूक जाण आहे.
अर्थसंकल्पावरही अजित पवारांची छाप
नवीन सरकारमध्ये अर्थमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर विकासाभिमुख निर्णय घेतले. शेतीला दिलासा, औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन, शिक्षण क्षेत्रात डिजिटल यंत्रणांचा वापर, आणि महिला-युवकांसाठी रोजगार योजनांचा विस्तार, कृत्रीम बुध्दीमत्तेच्या वापराला प्रोत्साहन, कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर, सर्व घटकांना पुरेसा निधी कसा मिळेल, याची काळजी त्यांनी घेतली. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सर्वसमावेशक अर्थसंकल्प कसा सादर होईल असा प्रयत्न त्यांनी केला.
कोविडच्या काळातही महत्त्वाची भूमिका
उपमुख्यमंत्री म्हणून कोविडच्या काळातही अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोग्य व्यवस्थेचा विस्तार, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देणे आणि आर्थिक पॅकेज जाहीर करणे, अशा जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत तडफेने पार पाडल्या. रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यापासून ते औषधोपचार व्यवस्थित होतील, अर्थकारणाच्या गतीवर परिणाम होणार नाही, या बाबी विचारात घेत त्यांनी वेगाने निर्णय घेतले. त्या काळात इतर कोणीही मंत्री मंत्रालयात येत नसत, मात्र दादा त्या काळातही नियमित मंत्रालयात जाऊन राज्याच्या परिस्थितीचा नियमित आढावा घेत होते.
राजकारणातील समन्वयक भूमिका
राजकारणात विविध पक्ष आणि विचारधारा कार्यरत असतात. अजित पवार यांनी सदैव समन्वयवादी भूमिका घेतली आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारात योग्य समतोल राखून निर्णयप्रक्रिया पार पाडली. त्या नंतर महायुतीच्या सरकारमध्येही त्यांची भूमिका ही कायमच सर्वांना सोबत घेऊन जायची असते. टीकाटीपण्णी होऊनही न डगमगता ते सरकारची प्रतिमा कायम चांगली कशी राहील, याचाच प्रयत्न करताना दिसतात. तिन्ही घटक पक्षात समन्वय राखण्यासाठीही ते प्रयत्न करतात. सत्तेत असो वा विरोधात कायमच त्यांनी लोकांच्या भल्यासाठीची भूमिका घेतली, विकासाभिमुख निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांचा कायम नावलौकीक राहिला आहे. इतर बाबींवर आपली शक्ती खर्च करण्यापेक्षाही काहीतरी रचनात्मक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सामान्य माणसासाठी कार्यरत
अजित पवार यांचा सर्वांत मोठा गुण म्हणजे ते सामान्य माणसासाठी सतत कार्यरत असतात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांना सवलतीत वीज आणि पाणी, बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण, महिला बचतगटांना निधी, कृषिपूरक योजनांवर भर, उद्योजकांना प्रोत्साहन, व्यापारी वर्गाला मदतीची भूमिका अशा सर्व स्तरातील घटकांना सोबत घेऊन ते काम करतात. ज्याच्या पाठीशी कुणी नाही त्याच्या मदतीला धावणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. अजितदादांकडे जाताना कोणाच्या ओळखीची किंवा वशिल्याची कधीच गरज भासत नाही. कोणीही त्यांना थेट भेटून आपल्या समस्या सांगू शकतात, त्यांच्याकडून तातडीने समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही केला जातो, हे अजित पवार यांच्या कार्यशैलीचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल.
जनसामान्यांचे जीवन बदलण्याचा ध्यास
सलग तीन दशकांहून अधिक काळ मोठ्या मताधिक्याने अजित पवार बारामतीतून का विजयी होतात, हे समजून घ्यायचे असेल तर बारामतीत येऊन त्यांनी केलेला विकास एकदा पाहायला हवा. त्या शिवाय हे समीकरण कोणालाच समजणार नाही. अजित पवार हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे एक सशक्त शिल्पकार आहेत. त्यांचे काम हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनसामान्यांचे जीवन बदलण्याचा ध्यास घेणारे आहे. प्रसिद्धीपासून कायम अलिप्त राहत आपले काम करत राहणे हेच अजित पवार यांचे ध्येय आहे, काहीतरी निर्माण करत राहण्यावर त्यांचा कायम भर असतो, त्या नुसारच ते कायम काम करत राहतात. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला केवळ आज नव्हे तर भविष्यातही दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही.
शिस्त, निर्णयक्षमता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि लोकाभिमुखता ही त्यांची ओळख आहे. हेच त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना या राज्याची धुरा त्यांनी सांभाळावी हीच प्रार्थना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.