मृत्यूनंतरही नातेवाइकांना होतोय मनस्ताप
बारामती, ता. २३ : अनेकांच्या नशिबात आयुष्यभर संघर्ष असतो. जगण्याची धडपड करताना लोक कायम लढत असतात, मृत्यूनंतर तरी शांततेने इहलोकीची यात्रा संपावी असे अनेकांना वाटते. मात्र, शासकीय अनास्थेने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या शवविच्छेदनादरम्यान नातेवाइकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागतो.
आत्महत्या, अपघात, अचानक झालेल्या मृत्यूनंतर कायद्यानुसार शवविच्छेदन करावे लागते. अचानक झालेल्या मृत्यूनंतर कमालीच्या दुःखात असलेल्या नातेवाइकांना शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान शासकीय अनास्थेचा सामना करावा लागतो. बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय व रुई ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले जाते. त्या ठिकाणी या प्रक्रियेसाठी कटर हे एक पद असते. दोन्ही रुग्णालयात हे पदच भरण्यात आलेले नसून, काही खासगी इसमाच्या मदतीने ही प्रक्रिया कशीतरी पार पाडली जाते. ज्या खासगी इसमाची मदत घेतली जाते, त्यांना या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिलेले आहे की नाही, याची माहिती कोणालाच नाही. डॉक्टर फक्त त्या प्रक्रियेदरम्यान उपस्थित असतात. मात्र, विच्छेदनाची प्रक्रिया करणारी व्यक्ती कोण आहे? तिला माहिती आहे की नाही? प्रशिक्षण आहे की नाही? त्यांना तो अधिकार आहे की नाही? याची कसलीही खातरजमा न करता ही शवविच्छेदन प्रक्रिया राजरोसपणे सुरू आहे.
संबंधित खासगी व्यक्तीला याचा मोबदला मिळत नसल्याने नातेवाईकांकडून त्यांच्या मनाजोगते पैसे आल्याशिवाय शवविच्छेदनाची प्रक्रियाच पार पडत नाही. अंत्यसंस्काराची घाई असल्याने नातेवाईक फारशी चर्चा न करता पैसे देऊन मोकळे होतात व त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया अक्षरशः पार पाडली जाते.
या प्रक्रियेसाठी पैसे का मोजायचे? असा प्रश्न नागरिकांना पडल आहे. पण यावर कोणीही बोलत नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे अशा घटना घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व पुन्हा शवविच्छेदनापूर्वीचा पोलिस पंचनामा ही एक मनस्ताप देणारी प्रक्रिया आहे. बारामतीत बँक व्यवस्थापकाच्या आत्महत्येनंतर त्याचा पंचनामा होऊन शवविच्छेदन होईपर्यंत आठ तासांचा कालावधी उलटून गेला होता. तीन मृतदेहांचा पंचनामा एकाच पोलिसाने केला, तोही वैतागून गेलेला होता, तेथेही नातेवाइकांना शासकीय प्रक्रियेचा कमालीचा मनस्ताप झाला.
पंचनाम्यासाठी पोलिस वेळेवर येत नाहीत
पोलिसांसाठी या बाबी नवीन नसल्या तरी थोडी संवेदनशीलता दाखवायला हवी, अशी नागरिकांची अपेक्षा असते. पंचनाम्यासाठी वेळेवर पोलिस कधीच येत नाही, ही कायमची ओरड आहे. मृत्यूनंतरही नातेवाईकांकडून अनेक ठिकाणी पैशांची असलेली अपेक्षा हा यातील सर्वात गंभीर विषय असून, या बाबत वरिष्ठ स्तरावर कार्यवाहीची बारामतीकरांची मागणी आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये फक्त कटर हे पद निर्माण करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे पद सध्या अस्तित्वात नाही. शासन स्तरावर हे पद निर्माण झाल्यास वेळेवर शवविच्छेदन शक्य होईल.
- डॉ. महेश जगताप, वैद्यकीय अधीक्षक, सिल्वर ज्युबिली रुग्णालय, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.