संवेदनशील बारामतीकरांनी प्रशासनावर वाढविला दबाव
बारामती, ता. ३० : बारामतीत रविवारी (ता. २७) झालेल्या अपघातात वडील व दोन मुलींना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर संवेदनशील बारामतीकरांनी पुढाकार घेत प्रशासनावर दबाव वाढवत जलद कारवाई करण्यासाठी भाग पाडले.
अपघातानंतर अनेक नागरिक हळहळले. ‘नुसते बोलून चालणार नाही, आता पुढाकार घेत आपणही काहीतरी करायला हवे’, या भावनेतून अनेक जणांनी उपयुक्त सूचना केल्या, माहिती दिली, उपाययोजना सांगितल्या. काहींनी रोष व्यक्त केला, तर काहींनी प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले. काहीजणांनी यासाठी केलेल्या ‘अपघातमुक्त बारामती’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर जडवाहनांची सुरू असलेली वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फोटो प्रसिद्ध केले. पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे कारवाईची मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. दरम्यान, अरुंद रस्ते, अस्ताव्यस्त पार्किंग, पदपथांवरील अतिक्रमण, धोकादायक अवजड वाहनांची वाहतूक यावर समाजमाध्यमांसह स्थानिक माध्यमांनीही टीकेची झोड उठवल्याचे दिसले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपयोग शून्य
बारामतीत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह कारवाईच्या कामात काहीही योगदान दिले जात नसल्याने नागरिकांनी कमालीचा रोष व्यक्त केला. सोमवारपासून सुरू असलेल्या आंदोलन व इतर प्रक्रियेत या विभागाचे प्रमुख अधिकारी गैरहजर होते. बैठकीलाही त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून देत, या विषयाकडे ते किती गांभीर्याने पाहतात हेच दाखवून दिल्याची लोकांची भावना आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार रस्त्यावर उतरून अवजड वाहनांवर कारवाई करत असल्याचे पाहून झोपलेल्या आरटीओ विभागाला जाग आली. त्यानंतर तेही कारवाईत सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.