बारामतीत वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची मागणी
बारामती, ता. ५ : गेल्या काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या अपघातात वडील व दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था नीट व्हावी यासाठी मोहीम हाती घेतली असून, प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे काही बदल दिसत आहेत. शहरात आता वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
गतिरोधकांबाबत सध्या मागेल त्याला गतिरोधक देण्याची भूमिका नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतली आहे. गेल्या चार दिवसांत शहरात अनेक ठिकाणी गतिरोधक निर्माण झाले आहेत. दुसरीकडे वाहतूक नियंत्रक दिव्यांची मागणी शहरात जोर धरू लागली आहे. गर्दीच्या ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी या दिव्यांची गरज नागरिक बोलून दाखवीत आहेत. यापूर्वी बारामतीत लाखो रुपये खर्चून वाहतूक नियंत्रक दिवे बसविले गेले. मात्र, त्याचा वापरच प्रशासनाने न केल्याने त्याचा फारसा फायदा झाला नाही.
गर्दीच्या ठिकाणी असे दिवे असतील तर आपोआपच वाहतूक सुरळीत होईल व लोकांना रस्ता ओलांडणे सुकर होईल, अशी भावना नागरिकांची आहे. पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित हे काम करावे अशी नागरिकांची मागणी आहे.
याठिकाणी वाहतूक नियंत्रक दिव्यांची गरज
भिगवण चौक, इंदापूर चौक, गांधी चौक, गुनवडी चौक, तीन हत्ती चौक, पंचायत समितीनजिक, कोर्ट कॉर्नरनजिक, विद्या कॉर्नरचौक, कारभारी सर्कल, सम्यक चौक.
शहरातील अनेक बाबी चुकीच्या झाल्या असून, त्या बदलण्याची गरज आहे. या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ मागितली आहे. वाहतूक नियंत्रक दिव्यांची आता बारामतीत नितांत गरज आहे. प्रशासनाने जसे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, त्याच धर्तीवर नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वाहनतळाची सोय, पदपथावरील अतिक्रमण, गतिरोधकांचा विषय या सर्वच बाबतीत काहीतरी ठोस करण्याची गरज आहे.
- प्रशांत सातव, सचिव धों.आ. सातव चॅरिटेबल ट्रस्ट, बारामती