
बारामती, ता. २४ : शहरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वावरताना ओळखपत्र घालत नसल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांचा संवाद कोणाशी झाला हे समजण्यास मार्गच नसतो. वरिष्ठांनी वारंवार सूचना देऊनही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत सर्रास ओळखपत्राविना कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आता कान टोचले पाहिजेत, अशी नागरिकांची भावना आहे.
शहरातील प्रशासकीय भवन येथे विविध शासकीय कार्यालय आहेत. या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तरी कर्मचारी व अधिकारी यांनी ओळखपत्र वापरल्यास संबंधित कर्मचारी कोण आहे? हे नागरिकांना समजू शकते. अनेकांच्या कार्यालयातील दालनात त्यांच्या नावाच्या पाट्या नसल्याने कोणत्या खुर्चीवर कोण कर्मचारी व अधिकारी आहे? हेच लोकांना समजत नाही. अनेकदा खुर्चीवर बसलेला कार्यालयीन कर्मचारी आहे की बाहेरील व्यक्ती? हे ही समजत नाही. काही ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनाही ओळखपत्र दिलेले नसल्याने ते नेमके कोण, त्यांची जबाबदारी काय? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
अनेकदा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस कर्मचारी व अधिकारी जागेवर नसतात. ते नेमके कुठे गेले? कोणत्या कामासाठी गेले? हे त्यांना भेटायला आलेल्या नागरिकांना समजत नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने त्यांना हेलपाटे मारावे लागतात.
कोणत्याच अधिकारी व कर्मचारी यांच्या दालनाबाहेर संबंधित अधिकारी व कर्मचारी जागेवर उपस्थित नसतील तर ते का उपस्थित नाही याची माहिती दिलेली नसते. अनेकदा कार्यालयातील इतरांनाही साहेब नेमके कुठे व कशासाठी गेले आहेत, ते कधी परतणार? याची माहिती नसते. परिणामी नागरिकांचा हेलपाट्यांचा कार्यक्रम सुरुच राहतो.
साहेबांना जाब विचारावा म्हटलं तर ते कामच अडवून ठेवतील या भीतीने कोणी काहीच बोलत नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांचे लागेबांधे इतके मजबूत असतात की अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित नसल्याचा जाबच विचारू शकत नाही, अशी अनेक शासकीय कार्यालयातील स्थिती आहे.
शासकीय कार्यालयात अनेकदा कर्मचारी व अधिकारी ओळखपत्र वापरत नसल्याने कोणाशी बोलणे झाले हेच समजत नाही. ओळखपत्राची सक्ती गरजेची आहे. उपस्थितीबाबतही वरिष्ठांनी लक्ष घालायला हवे.
- अनिल शिंदे, नागरिक, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.