बारामतीतील मिरवणुकीत गणेशभक्तांचा उत्साह
बारामती, ता. ७ : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मोठ्या जड अंतःकरणाने बारामतीकरांनी लाडक्या विघ्नहर्त्याला शनिवारी (ता. ६) निरोप दिला. काही काळ पावसाच्या हलक्या सरी आल्या, पण त्याचा भक्तांच्या उत्साहावर काहीही परिणाम झाला नाही.
आबालवृद्धांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत बाप्पांचे विसर्जन केले. सकाळी दहापासून सुरु झालेले विसर्जन पहाटे पावणेतीन वाजेपर्यंत अखंडपणे सुरु होते. पोलिस व नगरपरिषद प्रशासनाने जय्यत तयारी केल्याने शांततेत विसर्जन पार पडले.
बारामती नगरपरिषदेने यंदा ३६ ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाची सोय केली होती. कृत्रिम जलकुंडात बहुसंख्य नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन करत पर्यावरणपूरक विसर्जनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत केली. बारामतीत जवळपास चारशेहून अधिक मूर्त्यांचे संकलन झाल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली.
दोन सत्रात जवळपास चारशे कर्मचाऱ्यांनी अथकपणे काम करत विसर्जनासाठी बारामतीकरांना मदत केली. काही सेवाभावी संस्था, विद्यार्थ्यांनीही या कामी मदतीचा हात देऊ केला. अपवाद वगळता बहुसंख्य मंडळांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलिस निरीक्षक विलास नाळे, वैशाली पाटील व चंद्रशेखर यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीचे स्वागत केले गेले.
नटराज नाट्य कला मंडळाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलच्या गणरायाची फुलांनी सजवलेल्या पालखीतून, भजनी मंडळाच्या टाळ- मृदंगाच्या गजरासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्यासह नटराजचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध मंडळाच्या ढोल ताशा पथकाने मिरवणुकीत रंगत आणली. ढोलाच्या तालावर नागरिकांनी ठेका धरला होता.
शहरात जागोजागी गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल, हलगी ताशा बँड पथकांच्या तालावर कार्यकर्त्यांनी लाडक्या बाप्पांना निरोप दिला.
कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम
विसर्जनाच्या आदल्या दिवसापासूनच बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृत्रिम कुंडासह, निर्माल्य संकलन व इतर व्यवस्थेची जय्यत तयारी केली होती. विसर्जनाच्या दिवशीही नगरपरिषदेची संपूर्ण टीम जवळपास वीस तासांहून अधिक काळ कार्यरत होती. विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी शहर स्वच्छता केली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.