बारामतीकरांची अभिरुची जपणारे नटराज नाटय कला मंडळ.......

बारामतीकरांची अभिरुची जपणारे नटराज नाटय कला मंडळ.......

Published on

अभिरुची जपणारे नटराज नाट्य कला मंडळ

ग्रामीण भागातील रसिकांची अभिरुची जपून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्याचा प्रयत्न करणारी नटराज नाटय कला मंडळ ही संस्था ९ ऑक्टोबर रोजी ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
किरण गुजर या सांस्कृतिक चळवळीला वाहून घेतलेल्या एका युवकाने ९ ऑक्टोबर १९७९ रोजी काही ठराविक सहका-यांना सोबत घेत नटराज नाटय कला मंडळ या संस्थेचे रोपटे लावले. आज जवळपास पाच दशके अथकपणे सातत्याने ग्रामीण रसिकांना उत्तमोत्तम नाटय, सांगितिक, नृत्य, कलाविष्कार असलेले कार्यक्रम पाहता यावेत या ध्येयाने प्रेरित होऊन किरण गुजर आणि नटराज परिवार कार्यरत आहेत.

नाटक, एकांकिका, गाण्यांचे व इतर सांस्कृतिक कार्यक्रम बारामतीतच पाहता यावेत, सोबतच स्थानिक कलावंतांनाही एक सक्षम व्यासपीठ निर्माण व्हावे या साठी ही संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. बारामतीसारख्या छोटया शहरात सर्व आव्हानांना सामोरे जात सलग ४६ वर्ष अखंडपणे अशी संस्था चालविणे हे अशक्यप्राय काम या परिवाराने सुरु ठेवले आहे.

बारामतीतील नाटयसंमेलन असो किंवा कोणताही महोत्सव असो, नटराज परिवाराचे योगदान त्यात महत्वाचे असते. येथे येणारे कलावंत व सांस्कृतिक चळवळीशी संबंधित प्रत्येकाचे एक हक्काचे ठिकाण म्हणून नटराज नाटय कला मंडळाचा उल्लेख केला जातो. रंगभूमी व सिनेमा अशा दोन्ही घटकांशी संबंधित प्रत्येकालाच बारामतीत येताना किरण गुजर यांची आवर्जून आठवण येते. बारामती गणेश फेस्टीव्हलचा प्रारंभ केल्यानंतर तब्बल २४ वर्षे हा महोत्सव किरण गुजर यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडला. आगामी वर्ष या फेस्टीव्हलचे २५ वे वर्ष असून या काळात अनेक मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बोलून दाखविलेला आहे.

लावणी महोत्सव, प्रथम युवा नाटयसंमेलन, असंख्य नाटके, एकांकीका, नृत्य व सांगितिक कार्यक्रम, स्थानिक कलावंतांचे केलेले कार्यक्रम यांची गेल्या पाच दशकातील मोठी कामगिरी आहे. केवळ कार्यक्रम सादर करण्यापुरतीच या परिवाराची जबाबदारी कधीच नसते तर आपत्ती व संकटाच्या वेळेस निधी संकलनासाठीही त्यांनी अनेकदा अनेक संस्थांना मदत केली. त्यांच्या प्रगतीत हातभार लावत नटराजने खारीचा वाटा उचलला. आजवर ४० लाखांहून अधिकचा निधी या चळवळीच्या माध्यमातून उभारुन विविध संस्थांना देण्याचे काम या संस्थेने केले आहे, तेही निरपेक्ष भावनेने.

नाटकांच्या सादरीकरणासोबतच नाटक व एकांकीकाची निर्मितीही किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली नटराज परिवाराने केलेली आहे. आपल्या दैनंदीन जबाबदा-या सांभाळून नटराजसाठी वेळ देत हा परिवार अखंडपणे कार्यरत आहे, हे याचे एक वेगळेपण आहे.

बारामतीच्या विकासामध्ये किरण गुजर व नटराजच्या त्यांच्या सहका-यांनी सांस्कृतिक भूक भागविण्याचा मनापासूनचा प्रयत्न केला. या शहराच्या सर्वांगिण विकासामध्ये सांस्कृतिक चळवळ फोफावलेली आहे, ही बाबही महत्वाची ठरली.

नाट्य चळवडीच्या वाटचालीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबियांसह समस्त बारामतीकरांनी किरण गुजर व त्यांच्या सर्वच सहका-यांना मनापासून साथ दिली. राजकीय मतभेद झाले तरी सर्वच राजकीय सहकारी देखील किरण गुजर यांच्याशी आपुलकीच नात कायम टिकवून आहेत. अनेक दिग्गज कलाकार व कलाकृतींना जवळून पाहण्याचा आणि अनुभवण्याचा योग या संस्थेने बारामतीकरांना आणून दिला. मोबाईल व ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आजच्या जगातही नाटक आणि रंगभूमीवरील कलाकार कायम टिकून राहायला हवेत असे वाटण्यासह त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड करणारे किरण गुजर यांच्या सारखे नेतृत्व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनाही कायमच निकटचे वाटत राहीले. बारामतीत रुजलेली ही चळवळ अखंडपणे पुढे नेण्याचा संकल्प नटराज परिवाराने केलेला आहे.


13774, 13775

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com