बारामती शहरात दान दिवस उपक्रम
बारामती, ता. १३ : एखादी चांगली गोष्ट उभी राहताना पाहिल्यानंतर बारामतीकर त्याच्यासोबत उभे ठाकतात व सढळ हाताने दातृत्वाचा परिचय देतात, याचा प्रत्यय रविवारी (ता. १२) आला. येथील अजिंक्य संस्थेच्या वतीने आयोजित दान दिवस उपक्रमात तब्बल दोन ट्रकहून अधिकचे साहित्य गोळा झाले.
वापरात नसलेले जुने साहित्य या दान दिवस उपक्रमात मागण्यात आले होते. प्रत्यक्षात अनेक दानशूर बारामतीकरांनी नवीन साहित्य खरेदी करून या उपक्रमासाठी आणून दिल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष करण चंद्रगुप्त शहा (वाघोलीकर) यांनी दिली.
या प्रसंगी करण वाघोलीकर यांच्यासह सतपाल गावडे, सुजित कोरे, अजित लव्हे, सोमनाथ शेटे, संदीप लव्हे, अजित सातव, मंदार कळसकर, हर्षदा माने, पूजा करे, अक्षता बाबर, वैष्णवी जाधव, स्वराली बेलदार, श्रावणी जाधव, वैष्णवी माळवे, चैत्राली पवार, मेघा चिंचकर यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
दरवर्षी बारामतीकरांकडून अजिंक्य संस्थेच्या वतीने जुने कपडे, ब्लँकेट, पुस्तके, खेळणी, शालोपयोगी साहित्य जमा करून ते गूंज या स्वयंसेवी संस्थेकडे सोपविले जाते. त्यानंतर त्यावर योग्य प्रक्रिया करून ते गरजूंना प्रत्यक्ष जागेवर नेऊन सुपूर्द केले जाते.
रविवारी बारामतीकरांनी शूज, कपडे, पुस्तके आदी साहित्य उत्स्फूर्तपणे या दान दिवस उपक्रमाच्या ठिकाणी आणून दिले. एका चांगल्या कामाला हातभार लावण्याच्या उद्देशाने काही बारामतीकरांनी स्वखर्चाने विकत साहित्य आणून दिले. काही दानशूर व्यक्तींनी नव्या साड्या या उपक्रमासाठी खारीचा वाटा म्हणून आणून दिल्या आहेत.
विशेष म्हणजे या वस्तू दान दिवस उपक्रमात देताना बहुसंख्य बारामतीकरांनी आपल्या नावाचा उल्लेख असू नये, अशी भावना व्यक्त केल्याचेही करण वाघोलीकर यांनी सांगितले.
13807