बारामतीत चाकू दाखवून लुटणाऱ्या दोघांना पकडले
बारामती, ता. १० : येथील एमआयडीसी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेस चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चैतन्य राजेंद्र केकाण आणि धीरज हरिश्चंद्र पवार (रा. बारामती) या दोघांना तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले. या कारवाईत लुटलेला सव्वापाच लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी वंजारवाडी पुलाजवळ महिलेची दुचाकी अडवून तिला चाकूचा धाक दाखवत सोन्याच्या बांगड्या व अंगठी हिसकविण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून, तसेच गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत चैतन्य केकाण व धीरज पवार या दोघांना पकडले. त्यांच्याकडून दागिने व दागिने विक्रीतून आलेली एक लाख ४० हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, धनश्री भगत, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार व दादा दराडे यांनी ही कामगिरी केली.

