बारामतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून संरक्षणाची मागणी
बारामती, ता. ९ : बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांच्याकडून जिवाला धोका असल्याची तक्रार बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पूर्णवेळ सशस्त्र पोलिस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असून, त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुख्याधिकारी भुसे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांची भेट घेत लेखी तक्रार केली. त्यात म्हटले आहे की, चौधरी हे वारंवार नगरपरिषद कार्यालयात जमावासह येऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, मारहाणीची, तसेच अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे, असे प्रकार करत आहेत. मुख्याधिकाऱ्यांकडे वर्गणी व रोख रकमेची मागणी केली असून, त्यास नकार दिल्यानंतर पालिकेत कचरा टाकण्याचा प्रकार केला, मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करण्याची जाहीर धमकी दिल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केली. ६ जानेवारी रोजी नगरपरिषदेत नगरसेवकांची अनौपचारिक बैठक आयोजित केली होती. या बैठकीशी मुख्याधिकाऱ्यांचा संबंध नसतानाही आपल्या मुलीला (नगरसेविका) मुद्दाम बैठकीस न बोलावल्याचा आरोप करत चौधरी यांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मुख्याधिकाऱ्यांना मारहाण, काळे फासणे व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
७ जानेवारी रोजी चौधरी यांच्या सांगण्यावरून तीन चार अज्ञात व्यक्ती नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांना शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, ‘धमकीमुळे मुख्याधिकारी पळून गेले’ असा खोटा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक प्रसारित केल्यामुळे अनोळखी क्रमांकांवरून धमक्या येत आहेत. चौधरी यांना नगरपरिषदेत प्रवेशबंदी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मला नगरपरिषदेत येण्याची बंदी घालायला ही खासगी मालमत्ता नाही. आपण दलित चळवळीतून पुढे आलो आहोत. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत आपली मुलगी नगरसेविका झाल्याची बाब काही जणांना पटत नाही. मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत, ही तक्रार पत्रकारांसह अनेक नागरिकांची आहे. मग माझेच फोन त्यांनी कसे उचलले? उलट त्यांनीच मला व्हॉट्सअॅप कॉल केले असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. शहरातील एका अतिक्रमण प्रकरणात त्यांनीच मला पाठपुरावा करण्यास सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अद्याप अतिक्रमण हटविले नसल्याने आपण त्याचा पाठपुरावा करत होतो.
- काळूराम चौधरी, प्रदेश महासचिव, बहुजन समाज पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

