बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता नाळे
बारामती, ता. १६ : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची शुक्रवारी (ता. १६) निवड करण्यात आली. तसेच, नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राहुल शहा-वाघोलीकर, सोमनाथ गजाकस, अमोल कावळे व गणेश जोजारे यांची नियुक्ती केली आहे. या निवडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
बारामती नगर परिषदेमध्ये नगरसेवकांच्या निम्म्या जागांवर महिला सदस्य असल्यामुळे महिलांना देखील समान प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने उपनगराध्यक्षपदी अजित पवार यांनी यांच्या रूपाने एका महिलेस संधी दिली आहे. नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड, तसेच स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
नव्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या कामकाजाला गती मिळेल, तसेच शहराच्या विकासकामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर नाळे व नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांनी अजित पवार यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याची ग्वाही देत बारामती शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
दरम्यान, स्वीकृत सदस्यांचा कालावधी हा एक वर्षाचा असेल, असे अजित पवार यांनी स्वतः जाहीर केलेले आहे. त्यामुळे एक वर्षानंतर पुन्हा चार नवीन चेहऱ्यांना नगरसेवकपदी संधी दिली जाणार आहे. ज्या समाज घटकांना नगरपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले नाही, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न अजित पवार करणार आहेत.

