बारामतीत शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी
बारामती, ता. २१ : अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी बुधवारी (ता. २१) आपले पत्ते खुले केले. बारामतीतील राजकीय गणितेच बदलल्याची चिन्हे या निवडणुकीत समोर येणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंचायत समितीच्या दोन जागा भाजपसाठी सोडून दिल्याची चर्चा होती.
शिर्सुफळ गणात भाजप नेते बाळासाहेब गावडे यांचे चिरंजिव अनिकेत गावडे यांनी कमळाच्या चिन्हावर, तर सुपे गणात उज्ज्वला पोपट खैरे यांनीही कमळाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही गणात राष्ट्रवादीने कोणत्याही उमेदवाराला अधिकृत एबी फॉर्मच दिला नाही. त्यामुळे या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने भाजपला बाय दिला आहे का, अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान छाननीनंतर राष्ट्रवादी या दोन गणात दोन उमेदवारांना पुरस्कृत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरीकडे नीरावागज गटात भाजप ज्यांच्यावर अवलंबून होते, त्या अभिजित देवकाते यांनी त्यांची पत्नी शिवानी यांचा अर्ज घड्याळाच्या चिन्हावर दाखल केल्याने येथे भाजपची चांगलीच पंचाईत झाली. भाजपच्या जिल्हाध्यक्ष व काही स्थानिक नेत्यांच्या मनमानीला कंटाळून आपण राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे अभिजित देवकाते यांनी सांगितले. पणदरे गटात राष्ट्रवादीचे मंगेश प्रतापराव जगताप यांच्या विरोधात अरविंद जगताप यांचे चिरंजीव सूरज जगताप यांनी भाजपमधून अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही जिल्हा परिषदेच्या दोन, तर पंचायत समितीच्या सहा जागा लढविणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी दिली.
बारामती तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरूद्ध भाजप व शिवसेना यांच्या प्रामुख्याने लढत होईल अशी चिन्हे आहेत. संध्याकाळी उशीरापर्यंत यादी तयार करण्याचे काम प्रशासकीय भवन येथे सुरु होते. शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
आपले उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही समजू नये, या साठी प्रयत्न केले गेले. अगदी सूचकांनाही आपण कोणत्या उमेदवाराला सूचक आहोत, हे शेवटपर्यंत समजले नसल्याचे काही जणांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

