दुःख बाजूला सारून आता पालकत्व स्विकारा

दुःख बाजूला सारून आता पालकत्व स्विकारा

Published on

बारामती, ता. ३० : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने खासदार सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, अशी अनेक बारामतीकरांची भावना आहे. सांत्वनासाठी आलेल्या अनेक महिलांसह नागरिकांनीही दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे दुःख बाजूला सारून आता बारामतीचे पालकत्व स्वीकार, अशी मागणी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
बारामतीतील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी शुक्रवारी असंख्य बारामतीकरांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर सुनंदा पवार, शुभांगी पवार उपस्थित होत्या. ‘दादा गेल्याचे दुःख आभाळाइतके आहे, त्यांची पोकळी कधीच भरून न येणारी आहे, असे असले तरी आता दुःखातून सावरून बारामतीचे पालकत्व तुम्ही स्विकारा, या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी दादांनी जे स्वप्न पाहिले होते ते साकारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या,’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. ‘दादा हे कामाचा माणूस म्हणून जनमानसात प्रसिद्ध होते. त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यासह या शहराच्या शिस्तबध्द विकासासाठी तुम्ही पुढे यावे,’ अशी मागणी काही महिलांनी केली.
‘अजित पवार सत्तेत असताना राज्य स्तरीय कामे हक्काने मुंबईत जाऊन बारामतीकर करून घेत असत. त्यामुळे विकासाची प्रक्रीया पुढे न्यायची असेल तर बारामतीच्या लोकप्रतिनिधीने सत्तेत राहणे आवश्यक आहे,’ अशी व्यापारी वर्ग तसेच बांधकाम व्यावसायिकांचीही भूमिका आहे.


दादा गेल्याचे दुःख आभाळाइतके आहे, मात्र तरिही या पुढील काळात अजितदादांची जागा सुनेत्रावहिनींनी घ्यावी व त्यांची राहिलेली कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढे यायला हवे.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती

देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचे जे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार यांनी आता सक्रिय होत बारामतीचे पालकत्व स्वीकारावे.
- धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन

सुनेत्रावहिनी पवार यांनी अनेक दशके अजितदादा यांचे राजकारण, समाजकारण जवळून पहिले आहे. त्यासाठी त्यांनी त्यागही केला आहे. त्यांनी तालुक्याची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती आम्ही केली आहेच, शिवाय राज्याची जबाबदारी पेलण्यास त्या सक्षम आहेत. जसे अजितदादा यांच्या पाठीशी आम्ही उभे होतो, तसाच भक्कम पाठिंबा त्यांनाही देऊ.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना

अजित पवार यांचे समाजकारण व राजकारण सुनेत्रावहिनींनी गेल्या अनेक वर्षात जवळून पाहिले आहे. त्यामुळे दादांच्या पश्चात त्यांनी नेतृत्व स्वीकारून बारामती व राज्याच्या विकासाला गती द्यावी.
- प्रफुल्ल तावरे, अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com