बारामतीत २५ लाखांचे दागिने लंपास

बारामतीत २५ लाखांचे दागिने लंपास

Published on

बारामती, ता. १ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीदरम्यान चोरट्यांनी सुमारे १५ जणांचे २५ लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बारामतीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांची धरपकड केली असून, त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी (ता. २९) लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व दागिने चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले.
याप्रकरणी बारामती तालुका पोलिसात आठ ते दहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. यामध्ये राजकुमार बाबूराव आठवले (रा. गेवराई, जि. बीड), महम्मद अनिस महमद युनूस, येजाज भग्गू मिरावले, मोहमद सादिक मोहमंद सिराज (सर्व रा. दिग्रस, जि. यवतमाळ), बाळू बबन बोत्रे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) व त्याचे दोन मित्र अशा संशयितांविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, चोऱ्यांबाबत रणजित बाबासाहेब जाधव व रमेश लालासाहेब वाबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. विजया गजानन पवार यांचा गंठण, नीलेश लक्ष्मण काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, विश्वजित तुपे, सतीश सातकर, अमोल ताटे, अंकुश दिघे, प्रशांत सपकळ, विकास भागवत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी या चोरट्यांकडे कसून तपास सुरू केला आहे. यातील सर्व सहभागी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले.

पोलिसांसमोरच चोऱ्यांचा प्रयत्न
अंत्यविधीप्रसंगी बारामतीत आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर चोरट्यांच्या टोळीने हात साफ करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी अक्षरशः हजारो पोलिस उपस्थित होते. चोरट्यांनी धाडस दाखवीत चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बंदोबस्तातील पोलिसांसमोरच चोऱ्यांचा प्रयत्न केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com