विद्या प्रतिष्ठान शाळेला ‘ग्रीन स्कूल चेंजमेकर’ राष्ट्रीय पुरस्कार
बारामती, ता. ४ : पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दिशेने राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय उपक्रमांसाठी येथील विद्या प्रतिष्ठानची न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेला नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट (CSE) यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘ग्रीन स्कूल प्रोग्रॅम चेंजमेकर’ पुरस्कार (माध्यमिक विभाग) नुकताच प्रदान करण्यात आला.
डॉ. ब्रविन कुमार यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, तर सीएसईच्या महासंचालिका सुनीता नारायण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन शाळेस गौरविण्यात आले. ग्रीन स्कूल प्रोग्रॅम हा देशव्यापी पर्यावरण शिक्षणाचा उपक्रम असून, देशभरातील २० हजारांहून अधिक शाळा या कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये देशातील विविध राज्यांतील ७४०७ शाळांनी हवा, ऊर्जा, अन्न, जमीन, पाणी आणि कचरा या सहा घटकांवर आधारित विविध उपक्रम व प्रकल्प राबविले.
या सर्वांचे सखोल मूल्यमापन करून देशभरातून केवळ ५.८५ टक्के शाळांचीच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यात विद्या प्रतिष्ठानच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश झाला आहे. शाळेने ऊर्जा बचत, प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन, तसेच जैवविविधतेला चालना देणारे उपक्रम प्रभावीपणे राबवून विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण केली. या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी प्राचार्या जॉयसी जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विज्ञान विभाग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले.
नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात विज्ञान विभागप्रमुख वैभव त्रिभुवन यांच्यासह नववीतील शार्दूल मोरे व शिवम रकटे यांनी शाळेचे प्रतिनिधित्व करीत पुरस्कार स्वीकारला.
संस्थेच्या विश्वस्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी शाळेचे अभिनंदन केले.
दिल्ली : पुरस्कार स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

