बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प कागदावरच
बारामती, ता. २१ : शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प पाच वर्षांहून अधिकचा काळ उलटूनही कार्यान्वित होऊ शकला नाही.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागात अनेकदा पाठपुरावा करूनही अजूनही हा प्रकल्प रखडलेलाच आहे. बारामतीकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहर आणि परिसरात ३२० कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक हालचाली, घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केला जाणार आहे. यासाठी अनेकदा प्रस्ताव तयार झाले, त्यात काही त्रुटी मुंबई स्तरावर काढल्या गेल्या, त्यांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा काही कारणे काढून हा प्रस्ताव लांबविला गेला. वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा होऊनही काही दिवसांपूर्वी हा प्रस्तावच रद्द झाला होता.
अजितदादांनी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा शासकीय धोरणांनुसार प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती आहे. वास्तविक शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प लवकर सुरु व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र प्रशासकीय घोडे नाचविण्याच्या पद्धतीमुळे पाच वर्षांहून अधिक काळ उलटूनही या बाबत मुंबई स्तरावर कागदपत्रात फक्त त्रुटीच काढल्या गेल्या.
उच्चस्तरीय समितीपुढे प्रकरण जाऊनही बारामतीच्या सीसीटीव्ही प्रकल्पाबाबत फार काही झाले नाही. राज्याच्या पोलिस महासंचालकांसह अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना या बाबत सूचना दिलेल्या असतानाही आजही या प्रकल्पाबाबत ठोस माहिती कोणाकडेच नाही अशी स्थिती आहे.
शहरात वाहनचोरीसह, दागिने चोरी, खून यांसारख्या घटनाही घडल्या, या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे ही बारामतीची गरज आहे. अनेक चुकीच्या बाबी कॅमेऱ्याच्या धाकामुळे घडणार नाहीत अशी खात्री पोलिस विभागालाही आहे, मात्र त्रुटी काढण्याच्या प्रकाराने बारामतीचा हा प्रकल्प लाल फितीतच अडकून पडला आहे.
अनेक वर्षांपासून या प्रकल्पाबाबत फक्त बैठका आणि बैठकाच झाल्या. प्रत्यक्षात प्रकल्प काही साकारलाच नाही. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल असे पोलिस अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात अजूनही शासकीय स्तरावर ही फाईल संथगतीने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.
विलंबामुळे वाढू लागला खर्च
जसजसा या प्रकल्पाला विलंब होत आहे, तसा याचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे पुन्हा अडचणी येत आहेत. स्वत: पोलिस महासंचालकांनी यात लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावण्याची बारामतीकरांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

