सूर्यघर योजनेत बारामती आघाडीवर

सूर्यघर योजनेत बारामती आघाडीवर

Published on

बारामती, ता. ५ : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत बारामती परिमंडळाने सौरऊर्जेच्या वापरात महत्त्वाचा टप्पा गाठत १०० मेगावॉट क्षमतेचा टप्पा पार केला आहे. परिमंडळातील २९ हजार ९३३ घरगुती ग्राहकांनी एकत्रितपणे १०१ मेगावॉट क्षमतेची सौर छत यंत्रणा (सोलर रूफटॉप) बसविली आहे. या योजनेतून घरगुती ग्राहकांना आतापर्यंत २०६ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
परिमंडळातील बारामती मंडळात ४ हजार ६७९ ग्राहकांनी १६.०२ मेगावॅट, सातारा मंडळात ८ हजार ५१६ ग्राहकांनी २७.९८ मेगावॅट, तर सोलापूर मंडळात १६ हजार ७३८ ग्राहकांनी ५७.०२ मेगावॉट क्षमतेची सौर छत यंत्रणा आस्थापित केली आहे. अनुदान वितरणात बारामती मंडळातील ग्राहकांना ३२ कोटी १० लाख रुपये, सातारा मंडळातील ग्राहकांना ५७ कोटी ९५ लाख रुपये, तर सोलापूर मंडळातील ग्राहकांना ११६ कोटी ६२ लाख रुपये देण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून १ किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॉटसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये इतके अनुदान थेट दिले जाते. तसेच, हाउसिंग सोसायटी व निवासी कल्याण संघटनांना ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज विकून उत्पन्नही मिळू शकते
घराच्या छतावर सौर प्रकल्प बसवून वीजनिर्मिती करून घराची विजेची गरज भागविणे हा या योजनेचा उद्देश आहे. वापराइतकी वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते, तर अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळू शकते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी सुमारे १०८ चौरस फूट जागा आवश्यक असून, दरमहा सरासरी १२० युनिट वीज निर्मिती होते. त्यामुळे वीजबिलात बचत होऊन गुंतविलेल्या रकमेची परतफेड साधारण ४ ते ५ वर्षांत होते.

Marathi News Esakal
www.esakal.com