ई-चलन प्रणालीमुळे वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या
बारामती, ता. ५ : राज्यभरात वाहतूकदार, मालवाहतूक वाहन संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना तसेच रिक्षा संघटनांकडून शासनाच्या ई-चलन प्रणालीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रणालीमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत विविध संघटनांच्या वतीने आंदोलनही सुरू असून शासनाने तातडीने दखल घेऊन प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी बारामतीतून करण्यात आली आहे.
बारामती परिसरातही विद्यार्थी वाहतूक, मालवाहतूक तसेच रिक्षा व्यवसायाशी संबंधित चालक व वाहनमालकांना ई-चलन प्रणालीमुळे अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच फोटो किंवा वाहन क्रमांकातील त्रुटी असूनही थेट दंडाची कारवाई होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या संदर्भात बारामती तालुका विद्यार्थी वाहतूक संघाच्या सदस्यांनी उपप्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांना गुरुवारी (ता. ५ ) निवेदन दिले. या प्रसंगी तानाजी बांदल, जहिद बागवान, चिंतामणी क्षीरसागर, गणेश सावंत, भूपेंद्र जाधव, नानासाहेब मदने, अनिल खुडे, गणेश कणसे, रणजित भापकर उपस्थित होते. याशिवाय तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने वाहनधारकांना संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ई-चलन प्रणाली उपयुक्त असली तरी प्रत्यक्षात अनेक वेळा ती दंडवसुलीचे साधन ठरत असल्याची भावना वाहनधारकांमध्ये निर्माण झाली आहे. म्हणून ई-चलन प्रणालीतील त्रुटी दूर करून चुकीच्या दंडाची त्वरित चौकशी व दुरुस्ती करावी, तसेच वाहनधारकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी मागणी वाहनधारक व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

