बारामतीचा जिरायती भाग होणार पाणीदार

बारामतीचा जिरायती भाग होणार पाणीदार

Published on

बारामती, ता. ६ : तालुक्यातील जिरायती भागासाठी महत्त्वाची असलेल्या नीरा-कऱ्हा नदी जोड व उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) सादर केलेल्या अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे.
बारामती तालुक्यावरील जिरायती हा शिक्का पुसून टाकण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना आखून हा प्रश्न कायमस्वरूपी संपविण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर या प्रकल्पाच्या भवितव्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती, आजच्या निर्णयाने हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार हे निश्चित झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात बारामती तालुक्यातील अनेक गावांना टँकरने पाणी देण्याची आवश्यकता भासते, पिकांनाही पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये टंचाईचा मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला होता. त्या मुळे यंदा सत्ता येताच हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा शब्द निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी स्वत: जातीने या प्रकल्पात लक्ष घालून त्याला गती देण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता देत अजित पवार यांना आदरांजली व्यक्त केल्याची या परिसरात भावना आहे.

काय आहे ही योजना....
या योजनेत २.३० मीटर व्यासाची पाइपलाइन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २३२८६ व दुसऱ्या टप्प्यात १४९९५ अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकूण १७ कि.मी. लांबीची ही पाइपलाइन असेल. या योजनेमध्ये नीरा डावा कालव्याच्या प्रभावक्षेत्राबाहेरील ३३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करून दोन टीएमसी पाणी शेतीसाठी या योजनेद्वारे वापरता येणार आहे. सौरऊर्जेवर या उपसा जलसिंचन योजनेचे पंप चालविण्याचे नियोजन असून त्यामुळे वीजबिलाचा बोजा पडणार नाही.

या योजनेत समाविष्ट गावे....
वाकी, भिलारवाडी, मुढाळे, ढाकाळे, चोपडज, चौधरवाडी, देऊळवाडी, गडदरवाडी, मगरवाडी, सस्तेवाडी, खंडोबावाडी, पणदरे, वाघळवाडी, करंजेपूल, वडगावनिंबाळकर, को-हाळे बुद्रुक, जळकेवाडी, खामगळवाडी, सोनकसवाडी, कुरणेवाडी, माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, क-हावागज, बारामती ग्रामीण, नेपतवळण, मेडद, काळखैरेवाडी, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, जळगाव सुपे, अंजनगाव, (यात नीरा डावा कालवा व जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्राबाहेरील भागाचा समावेश आहे).

सुनेत्रा पवार यांनी मानले आभार....
नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com